विश्वास पवार
पुसेगावच्या बाजारातील उलाढाल यंदा पन्नास टक्कय़ाने घटली
पश्चिम महाराष्ट्रात मोठय़ा यात्रांमधून भरणाऱ्या बैल व जनावरांच्या बाजारावर दुष्काळाचे सावट आहे. बाजारात शेतकऱ्यांचा जनावरे विकण्याकडे कल असताना खरेदीदरांची मात्र वानवा तर आहेच मात्र तुलेनेत कवडी मोल दराने मागणी होत असल्याने शेतकरी अस्वस्थ आहेत . व्यवहार न झाल्याने पुसेगावच्या बाजारातील उलाढाल या वर्षी पन्नास टक्कय़ाने घटली.
पश्चिम महाराष्ट्रात अनेक वर्षांपासून भरणाऱ्या पुसेगाव यात्रेत जनावरांच्या बाजारावर दुष्काळाचा मोठा परिणाम झाला. महाराष्ट्रातील मोठा बैल बाजार म्हणून या बाजाराकडे पाहिले जाते. दुष्काळी परिस्थिती त्यात पाण्याची तीव्र टंचाई यामुळे जनावरे सांभाळणे अशक्यप्राय झालेल्या शेतकऱ्यांचा कल जनावरे विकण्याकडे दिसून येत आहे. त्यामुळे विक्रीसाठी येणाऱ्या जनावरांची संख्या वाढली असली, तरी ती खरेदी करणाऱ्यांची मात्र वानवा आहे.
नेहमीच्या तुलनेत खूपच कमी दर मिळत असल्याने कवडीमोल भावाने जनावरे विकण्याची वेळ या शेतकऱ्यांवर आली आहे. या वर्षी दुष्काळामुळे गुरे, बैल सांभाळणे कठीण झाले असताना चारा पाण्याचा प्रश्न बिकट आहे. शेती उत्पन्न घटले आहे. अनेक शेतकऱ्यांची परिस्थिती गंभीर आहे.
मागील तीनचार वर्षांपासून जनावरे सांभाळण्याचा खर्च वाढला आहे. जनावरांच्या खाद्याची, औषधांची, लाशींची किमत वाढली आहे. यामुळे जनावरे सांभाळणे कठीण झाले आहे. पुसेगावला (ता. खटाव) येथे सेवागिरी महाराजांच्या रथयात्रेनिमित्त मोठा बैल बाजार भरतो. सातारा, सांगली, कोल्हापूर परिसरातील हा मोठा बैल व जनावरांचा बाजार असतो.
या वर्षी बाजारात मोठय़ा प्रमाणात खिलार बैल, खिलार जनावरे खरेदी-विक्रीसाठी आली. दरवर्षी या बाजारात अंदाजे नऊ ते दहा कोटी रुपयांची उलाढाल होते. या वर्षी दुष्काळामुळे मोठय़ा संख्येने बैल व जनावरे विक्रीसाठी येऊनही खरेदीदारच नाहीत. या बाजारात कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र प्रदेश येथून अनेक व्यापारी खरेदीसाठी येतात.
या व्यापाऱ्यांना शेतकरी लुंगीवाले व्यापारी बोलतात. त्यांची संख्याही रोडावली आहे. या वर्षी खरेदीदारांची वानवा, जनावरांची कमी भावात मागणी यामुळे सुमारे पंधरा दिवस चालणाऱ्या बाजारातील उलाढाल घटली आहे.
जनावरे सांभाळण्याचा खर्च परवडत नसल्याने खरेदी-विक्री मंदावली व या वर्षी साडेचार-पाच कोटींचाचाच व्यापार राहिला आहे. जनावरांच्या बाजारातील ही परिस्थिती चिंतनीय आहे.
खिलार बैल मोठय़ा प्रमाणात विक्रीसाठी
या वर्षी या बाजारात खिलार बैल विक्रीसाठी मोठय़ा प्रमाणात आले आहेत. शर्यतीसाठी खिलार बैलांची मागणी मोठी असते. हे बैल सांभाळण्याचा खर्च जास्त असतो. या बैलांचा वापरच राहिला नाही, शासनाचे याबाबत धोरण बदलले नाही तर खिलार जातच नष्ट होईल, अशी भीती शेतकरी व्यक्त करत आहेत. शासनाने पारंपरिक पशुधन जपणे वाढविणे गरजेचे आहे. यासाठी शेतकऱ्यांची मानसिकता तयार करणे, त्यांना पशुखाद्य,औषधोपोचार आदी परवडतील अशा दरात उपलब्ध करणे गरजेचे आहे. बैलगाडा शर्यती सुरू करणे गरजेचे आहे.