दुष्काळामुळे निर्माण झालेला पाण्याचा प्रश्न आता अधिकच घातक होत चालला असून कालव्याचे पाणी मिळावे, यासाठी शुक्रवारी औरंगाबादेतील शेतकऱ्यांनी नाशिकमधील नांदुर मध्यमेश्वर बंधाऱ्यावरील एक्स्प्रेस कालव्याच्या दरवाजांची कुलपे तोडली. यामुळे लाखो लिटर पाणी कालव्यातून वाहून गेले. या घडामोडींनी पाण्यावरून जिल्ह्यांजिल्ह्यांतील अंतर्गत संघर्ष वाढीस लागला आहे.
औरंगाबाद जिल्ह्य़ातील वैजापूर व गंगापूर तालुक्यांमधील ६९ गावांमधून गेल्या तीन दिवसांपासून पिण्याचे पाणी सोडण्याची मागणी केली जात आहे. वैजापूरमधील ४७ व गंगापूरमधील २२ गावे पाणीटंचाईने चांगलीच हैराण झाली आहेत. वरच्या भागात शेतीसाठी पाण्याचे आवर्तन सुरू असताना पिण्यासाठी १५ मार्च व १५ मे रोजी दोन आवर्तने सोडण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी औरंगाबादच्या विभागीय आयुक्तांना पत्र दिले. हे पत्र नाशिकच्या विभागीय आयुक्तांकडे पाठविले. त्यावर अजून कोणताही निर्णय झाला नाही. या पाश्र्वभूमीवर शुक्रवारी दुपारी वैजापूर तालुक्यातील सुमारे २०० आंदोलक टेम्पो, जीप आदी वाहनांद्वारे या बंधाऱ्यावर धडकले व एक्स्प्रेस कालव्याच्या दरवाजाचे टाळे तोडले. अकस्मात घडलेल्या या घटनेमुळे पाटबंधारे विभागाच्या कर्मचाऱ्यांची धावपळ उडाली. पोलीस कुमक घटनास्थळी येईपर्यंत जवळपास दोन तास लाखो लिटर पाणी कालव्याद्वारे वाहून गेले. पोलिसांनी या प्रकरणी सुमारे ८७ जणांना अटक केली आहे. औरंगाबादला गंगापूर धरणातून पाणी सोडण्यावरून याआधी अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यांत बराच संघर्ष झाला आहे.  निफाड तालुक्यातील नांदुर मध्यमेश्वर हा बंधारा नाशिक व नगरच्या सरहद्दीवर आहे. नांदूर-मधमेश्वर बंधाऱ्यात १.८० टीएमसी पाणीसाठा असून, वैजापूर व गंगापूरच्या जनतेसाठी पिण्याकरिता ०.८० टीएमसी पाणी सोडणे क्रमप्राप्त असल्याचे आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे. परंतु, हा विषय शासन स्तरावरील असल्याचे नाशिकचे जिल्हाधिकारी विलास पाटील यांनी सांगितले.  

Story img Loader