सांगली : जतमधील दुष्काळग्रस्त गावातील पाण्यापासून वंचित असलेल्या नागरिकांनी बुधवारी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिध्दरामय्या यांच्याकडे पाण्यासाठी साकडे घालत कर्नाटकमध्ये सामील करुन घेण्याची मागणी केली. महाराष्ट्र सरकार आम्हांला पाणी देत नाही.आम्हांला कर्नाटकात घ्या अशा आशयाचे फलक घेऊन जतच्या दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना कार्यक्रमात जात विनंती केली. कोट्टलगी मध्ये पाणी पुरवठा सिंचन योजनेचा शुभारंभ कर्नाटकचे मुख्यमंत्री सिध्दरामय्या व उपमुख्यमंत्री डी.के.शिवकुमार यांच्या हस्ते बुधवारी संपन्न झाले.
हेही वाचा >>> सोलापूर : काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांना मंगळवेढ्यातून परत पाठवले, मराठा आरक्षण आंदोलकांचा रोष
या कार्यक्रमात उमदी,सुसलाद,बालगाव ,हळ्ळी, अंकलगी,तिकोंडी,भिवर्गी, करजगी सह २५ ते ३० गावातील दुष्काळग्रस्तांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना पाण्यासाठी साकडे घातले. कर्नाटकातल्या कोट्टलगी येथे अम्यजेश्वरी उपसा सिंचन योजनेचे भूमिपूजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या योजनेद्वारे जत तालुक्याच्या पूर्व भागातील गुड्डापूर, मुचंडी,दरीबडची अशा तब्बल ४२ गावांमधील ३० हजार हेक्टर क्षेत्र कायमस्वरूपी ओलिताखाली येवून येथील जनतेच्या पिण्याच्या तसेच शेतीचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी मिटू शकतो असे त्यांचे म्हणणे आहे. महाराष्ट्राचे सत्ताधारी केवळ कोरड्या घोषणा देण्यापलीकडे कांहीही करत नसल्याने जत तालुक्यातील या दुष्काळग्रस्त जनतेने आम्हांला पाणी द्या; कर्नाटकात सामावून घ्या अशी हाक देत कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांकडे आज विनंती केली.