फुले महागल्याने बाजारात  प्लास्टिकच्या फुलांचा गुलदस्ता

दुष्काळी परिस्थितीमुळे फूल बाजारही कोमेजून गेलेला आहे. जरबेराचे फूल बाजारपेठेत दिसणेही दुर्मिळ झाले आहे. त्याऐवजी तीन-चार खऱ्या गुलाबांच्या फुलांमध्ये दोन-तीन कागदी किंवा प्लास्टिकच्या जरबेरा फुलांचा गुलदस्ता (बुके) सजवून विक्रीसाठी ठेवलेला पाहायला मिळत आहे. इतरही फुलांच्या दरात कमालीची वाढ झालेली आहे. गावरान मोगऱ्याचा दर किलोमागे ६०० ते ७०० रुपयांवर तर शिर्डीचा गुलाबही चांगलाच भाव खात आहे.

अत्यल्प पावसाअभावी मराठवाडय़ासह इतरही भागातील जलस्रोतांनी तळ गाठला आहे. सर्वत्र पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवत आहे. शेतीत कुठलेही पीक नाही. फुलशेती करणाऱ्यांनीही यावेळी अत्यल्पच क्षेत्र ठेवले आहे. मराठवाडय़ातील परभणी, नांदेड, मुदखेड, हिंगोली, परतूर आदी भागात केल्या जाणाऱ्या फुलांच्या शेतीतून आवक घटली आहे. परिणामी दर वाढले आहेत.

फुलांचे ठोक विक्रेते अरमान मलिक यांनी सांगितले की, जरबेरा फूल बाजारात दिसणेही मुश्किल झाले आहे. दीडशे ते २०० रुपयांना १० नग, अशी त्याची विक्री होत आहे. मालाची आवक एकदमच घटली आहे. त्यामुळे काही दुकानदार जरबेराच्या फुलासारखेच दिसणारे प्लास्टिक, कागदी फुल गुलदस्त्यात वापरत आहेत. तीन-चार गुलाबाची खरी फुले आणि एक-दोन प्लास्टिकची जरबेरा, असा गुलदस्ता बाजारात उपलब्ध आहे. शिर्डीच्या गुलाबाची ३०० रुपये शेकडा दराने विक्री होत आहे. तर किरकोळ गुलाब दीडशे ते दोनशे रुपये शेकडा आहे. निशिगंधाच्या फुलांचा दर ३५० रुपये किलो आहे. झेंडूही मध्यंतरी १०० रुपये किलोने गेला. आजचा दर ६० ते ७० रुपये किलो होता.

मोगऱ्याचा दर ६०० रुपये किलोवर

मोगरा गावरान आणि हायब्रीड अशा दोन प्रकारात येतो. गावरान मोगऱ्याचा दर ६०० ते ७०० रुपये किलो तर हायब्रीड मोगऱ्याचा दर ४०० रुपये किलो आहे. हा मोगरा साधारण पंजाब, बंगळुरूमधून येतो. लग्न तिथीच्या दिवशी मोगऱ्याच्या दरात आणखी वाढ होते. नवरदेवासाठी मोगऱ्याचा मोगले आझम सेहरा करायचा असेल तर त्यासाठी आता आठ हजार रुपये घेतले जात असल्याचे फूल विक्रेते इरफान यांनी सांगितले.