राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार शनिवारी जिल्ह्यातील अंबाजोगाई व परळी तालुक्यातील काही गावांना भेटी देऊन दुष्काळाची पाहणी करून परळीत मुक्काम करणार आहेत. मात्र, जिल्हाध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांनी आयोजित केलेली बीड येथील दुष्काळी परिषद ऐन वेळी रद्द झाल्यामुळे पवारांच्या दुष्काळी दौऱ्यापेक्षा राष्ट्रवादी अंतर्गत सुरू असलेल्या संघर्षांचीच चर्चा मोठी झाली आहे.
बीड जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार शनिवार, १५ ऑगस्ट रोजी लातूरमाग्रे दुपारी अंबाजोगाई येथे राष्ट्रवादीचे अक्षय मुंदडा यांच्या निवासस्थानी भेट देऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधतील. त्यानंतर काही गावांना भेटी देऊन परळीत विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या निवासस्थानी भेट देऊन कार्यकत्रे, पदाधिकारी यांच्याशी संवाद साधत सायंकाळी औष्णिक विद्युत केंद्राच्या विश्रामृहात मुक्कामाला थांबणार आहेत. जिल्ह्यातील दोन तालुक्यांतील दोन तरुण नेत्यांच्या घरी भेटी देऊन पवार यांचा दुष्काळी दौरा आटोपणार आहे.
या दौऱ्याच्या पाश्र्वभूमीवर राष्ट्रवादीचे नूतन जिल्हाध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांनी बीड येथे पवारांच्या उपस्थितीत दुष्काळी परिषद आयोजित करण्यात आल्याचे जाहीर केले होते. मात्र, एकच दिवसात पक्षांतर्गत संघर्षांतून वेगाने चक्रे फिरली आणि जिल्हाध्यक्षांनी नियोजित केलेली दुष्काळी परिषद निश्चित होण्यापूर्वीच बारगळली. राष्ट्रवादी अंतर्गत सध्या धनंजय मुंडे आणि आमदार अमरसिंह पंडित, अक्षय मुंदडा हे तरुण नेते पक्ष नेतृत्वाच्या मर्जीत आहेत, असा संदेश गेला आहे. महिनाभरापूर्वी जिल्हाध्यक्ष अशोक डक यांच्या जागी डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांची अचानकपणे नियुक्ती करण्यात आली. क्षीरसागर यांनीही नियुक्ती होताच जिल्हाभर दौरा करून एक दुष्काळी मोर्चा काढून आपली ताकद दाखवण्याचा यशस्वी प्रयत्न केला. त्याच वेळी अंतर्गत संघर्षांतून अनेक दिग्गजांसह पदाधिकाऱ्यांनीही त्याकडे पाठ फिरवली होती. या पाश्र्वभूमीवर डॉ. क्षीरसागर यांनी आयोजित केलेली पवारांच्या उपस्थितीतील दुष्काळी परिषदही रद्द करण्यात आल्याने क्षीरसागर विरोधी गटाला यश आल्याची चर्चा आहे.

Story img Loader