ललित पाटील ड्रग्ज प्रकरणात विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. ललित पाटीलने अद्यापही ठाकरेंच्या शिवसेनेचा राजीनामा दिलेला नाही. आपल्या पक्षातले लोक काय करतात? हे पाहणं उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांची जबाबदारी आहे. प्रत्येक प्रकरणाचा तपास एसआयटी किंवा सीआयडीकडे देण्याच्या सूचना उपसभापती नीलम गोऱ्हेंनी सरकारला दिल्या आहेत.
काय म्हणाल्या नीलम गोऱ्हे?
“ललित पाटीलने २०१६ मध्ये शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यावेळी शिवसेनेत फूट पडली नव्हती. संजय राऊत हे अत्यंत ज्ञानी, झुंजार संपर्क नेते होते त्यावेळी. उद्धव ठाकरेंच्या पाठोपाठ त्यांचीही जबाबदारी होती की त्यांनी ललित पाटील चौकशी करायला हवी होती. शिवसेनेत फूट पडल्यानंतर दादा भुसे शिंदे गटात आले. मात्र ललित पाटील ठाकरे गटातच आहे. त्यामुळे कुठल्या आधारे तुम्ही म्हणत आहात की हा माणूस यांचा आहे? अशा प्रकारे दिशाभूल करणं चुकीचं आहे.” असंही नीलम गोऱ्हे म्हणाल्या.
हे पण वाचा- Lalit Patil : ललित पाटील कोण आहे? छोटा राजन गँगच्या गुंडांशी संपर्कात येत कसा झाला ड्रग माफिया?
ललित पाटील प्रकरणाचा जो तपास करण्यात येईल त्या तपासामध्ये आरोग्य आणि वैद्यकीय अभ्यास असलेल्या आयपीएस अधिकाऱ्यंचा समावेश करण्यात यावा अशी मागणी देखील निलम गोऱ्हे यांनी यावेळी केली आहे. तर या प्रकरणात अन्न आणि औषध प्रशासनही तितकच जबाबदार असल्याचं यावेळी त्यांनी म्हटलं. एवढा बेकायदेशीर ड्रग्स कारखाना सुरू असतांना अन्न आणि औषध प्रशासनाकडून दुर्लक्ष कसं होऊ शकतं असा सवाल देखील निलम गोऱ्हे यांनी यावेळी उपस्थित केला. तसेच या प्रकरणात औषध मंत्र्यांनी दखल घ्यावी असं देखील त्यांनी म्हटलं आहे.
ललित पाटीलने अजून पक्ष कुठे सोडला आहे?
ड्रग्स प्रकरणाचे धागेदोरे पुणे, नाशिक, मुंबईत आहेत. अशा प्रकारच्या अवैध धंद्यांना कुणाचा आश्रय आहे? तसेच त्यांना कशामुळे प्लॅटफॉर्म मिळतो? असे प्रश्न नीलम गोऱ्हे यांनी या निमित्ताने उपस्थित केले आहेत. पुढे बोलताना नीलम गोऱ्हेंनी म्हटलं की, ‘२०१६ मध्ये पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली ललित पाटील याने पक्षात प्रवेश केला. आपल्या पक्षात कशी माणसं येतात, ते काय करतात ही जबाबदारी जशी उद्धव ठाकरेंची होती तशीच ही जबाबदारी संपर्क प्रमुख संजय राऊत यांची देखील होती.’ २०१६ मध्ये तो पक्षात आला होता त्यानंतर तो पक्षाच्या बाहेर गेला कधी गेला, दुसऱ्या पक्षात तो काम करायला लागला का यांसारखे प्रश्न नीलम गोऱ्हे यांनी उपस्थित केले आहेत. दरम्यान ‘त्याने अजूनही पक्ष सोडला नाही किंवा राजीनामा देखील दिला नाही, हे राजकारण योग्य नाही’, ललित पाटीलचा प्रवेश ज्याने घडवला त्याला माहित नाही का काय सुरु आहे? ललित पाटील अजूनही ठाकरेंच्या शिवसेनेत आहे. आम्ही सगळे नाही, तरीही दादा भुसेंवर आरोप केला जातो आहे. असं का? असं नीलम गोऱ्हे यांनी म्हटलं आहे.