दारु पिऊन वाहन चालविल्यास संबंधीत वाहनचालकाचा परवाना (लायसन्स) ६ महिन्यांसाठी निलंबीत करण्याचा निर्णय राज्य रस्ता सुरक्षा परिषदेने आज घेतलेल्या बैठकीत घेण्यात आला. ३१ डिसेंबरला सरत्या वर्षाला निरोप देताना अशाप्रकारचे अपघात जास्त होतात, त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय अतिशय महत्त्वाचा मानला जात आहे. तसेच विमा नसलेले किंवा विम्याची मुदत संपेलेले वाहन रस्त्यावर उतरवल्यास अशा वाहनावर तात्पुरत्या जप्तीची कारवाई करण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला. राज्याचे परिवहन मंत्री व रस्ता सुरक्षा परिषदेचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी ही माहिती दिली. वाढते अपघात रोखण्याच्या दृष्टीने आजच्या बैठकीत व्यापक चर्चा होऊन विविध निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी गृह राज्यमंत्री दीपक केसरकर, परिवहन आयुक्त शेखर चन्ने, एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक रणजितसिंह देओल, सार्वजनिक आरोग्य विभागाचे आयुक्त डॉ. अनुप यादव, सचिव (रस्ते) सी. पी. जोशी, अपर पोलीस महासंचालक (वाहतूक) विनय कोरगांवकर, सहपोलीस आयुक्त (वाहतूक) अमितेशकुमार यांच्यासह संबंधीत विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. वाहनचालकांनी दारुच्या नशेत वाहने चालविल्याने होणाऱ्या अपघातांचे प्रमाण जास्त आहे, ते रोखण्यासाठी आरटीओ आणि वाहतूक पोलीसांमार्फत सध्या मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात येत आहे.

मागील २ महिन्यात राज्यात एकूण १२ हजार वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली. त्यातील बहुतांश जणांवर दारु पिऊन गाडी चालविल्याच्या गुन्ह्याची नोंद करण्यात आली. अशा दारु पिऊन वाहन चालविणाऱ्या वाहनचालकांना जरब बसविण्यासाठी त्यांचा परवाना ६ महिन्यांसाठी निलंबीत करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे रावते यांनी सांगितले. विमा न उतरवलेले किंवा विम्याची मुदत संपेलेले वाहन रस्त्यावर उतरवल्यास आणि दुर्देवाने अशा वाहनाचा अपघात झाल्यास जखमी किंवा मृतास कोणत्याही प्रकारचे विमालाभ मिळत नाहीत. सध्या अशा वाहनांवर दंडात्मक कारवाई केली जाते. पण आता यापुढे अशा वाहनांवर जागेवर जप्तीची कारवाई करण्यात येणार आहे. त्यानंतर वाहनधारक विमा घेऊन आल्यावर आणि अधिकृत दंड भरल्यानंतरच वाहन परत देण्यात येईल असेही रावते यांनी सांगितले.

Story img Loader