धाराशिव : दि. २० : रस्त्यावरील खड्ड्याने एका तरुणाचा बळी घेतल्यानंतर शहरातील विविध संघटना आक्रमक झाल्या आहेत. प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे संपूर्ण शहरातील रस्ते खड्ड्यात गेले आहेत. अनेकजणांना कायमचे अपंगत्व आले आहे. जीव धोक्यात घेऊन शहरातून प्रवास करावा लागत असल्याने विविध २५ संघटनांनी मिळून सोमवारी शहर बंदची हाक दिली आहे. वाढत्या खड्डयांच्या निषेधार्थ काळ्या फिती लावून सोमवारी मूक मोर्चाही काढण्यात येणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सोमवारी सकाळी साडेनऊ वाजता शहरातील माऊली चौक येथून मूक मोर्चा सुरू होणार आहे. शहरातील विविध २५ संघटनांनी त्यासाठी पुढाकार घेतला आहे. परिसरातील सामान्य नागरिकही या मोर्चात सहभागी होणार आहेत. केवळ प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे तरुण व्यापाऱ्याला नाहक आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे शहरातील व्यापारी बांधवांनी या घटनेच्या निषेधार्थ सोमवारी दुपारी एक वाजेपर्यंत आपली दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय जाहीर केला आहे. जिल्हा व्यापारी महासंघ, जिल्हा विधीज्ञ मंडळ, सराफ सुवर्णकार असोसिएशन, जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट संघटना, जिल्हा पत्रकार संघ, जिल्हा मराठी पत्रकार संघ, व्हाईस ऑफ मीडिया, विविध वाहतूकदार संघटना, सराफ सुवर्णकार कारागीर संघटना, जिल्हा मोटार मालक वाहतूक संघटना, जिल्हा सिड्स अँड फर्टिलायझर असोसिएशन, मशिनरी असोसिएशन, किराणा व्यापारी असोसिएशन, अडत व्यापारी असोसिएशन, जिल्हा मुद्रक संघटना, इलेक्ट्रिक व इलेक्ट्रॉनिक्स असोसिएशन, प्रोफेशनल टीचर्स असोसिएशन, टॅक्स प्रॅक्टिशनर असोसिएशन, धाराशिव पेट्रोलपंप चालक-मालक संघटना, उस्मानाबाद जिल्हा विद्यार्थी वाहतूक संघटना, राष्ट्रीय मराठा महासंघ, शिवराज्याभिषेक सोहळा समिती यांच्यासह विविध २५ संघटना रस्त्यावर उतरणार आहेत.

हे ही वाचा…कराड: हवालाच्या तीन कोटी रुपयांवर दरोडा टाकण्यासाठी ‘हनी ट्रॅप’

गुरुवारी रात्री शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावरील खड्ड्यामुळे ओंकार जाधवर या २५ वर्षीय युवा व्यापाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. एकुलत्या एक मुलाला जाधवर कुटुंबीय मुकले आहेत. आठवडाभरापूर्वी श्रीपतराव भोसले हायस्कूल परिसरातही खड्ड्यात पडून एक वृद्ध महिलेचा अंत झाला आहे. प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे शहरातील जवळपास सर्वच रस्ते खड्ड्यात गेले आहेत. मोठी कसरत करीत वाहनचालकांना या रस्त्यातून वाट काढावी लागत आहे. वाढलेल्या या खड्ड्यांमुळे अनेकांना अपघाताला सामोरे जावे लागले आहे. अनेक कुटुंबांना लाखो रुपयांचा उपचार केवळ या खड्ड्यांमुळे घ्यावे लागले आहेत. तर खड्ड्यात पडून झालेल्या अपघातामुळे अनेकजणांना कायमचे अपंगत्व आले. या सर्व बाबींचा निषेध करण्यासाठी शहर बंद आणि मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मूक मोर्चात मोठ्या संख्येने शहरातील माता-भगिनी, विद्यार्थी-विद्यार्थिनी आणि सर्वसामान्य नागरिकांना सहभागी व्हावे असे आवाहन वरील सर्व संघटनांनी मिळून केले आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Due to potholes yong man died in dharashiv city local organizations becomes aggressive sud 02