छत्तीसगडचे मुख्यमंत्री रमणसिंह यांच्या नावाने बनावट शिधापत्रिका बनविणाऱ्या अज्ञात व्यक्तीविरुद्ध येथील सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
छत्तीसगडचे मुख्यमंत्री रमणसिंह यांच्या नावाने नाशिकमध्ये शिधापत्रिका दिली गेल्याचे प्रकरण विधानसभेत गाजले होते. शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी या संदर्भात प्रश्न उपस्थित केल्यानंतर शासनाने चौकशीचे निर्देश दिले. पुरवठा विभागाने चौकशी केली असता शिधापत्रिका बनावट असल्याचे निष्पन्न झाले. बनावट शिक्के व अधिकाऱ्यांची बनावट स्वाक्षरी करून ही शिधापत्रिका बनविण्यात आल्याचे स्पष्ट झाले. प्राथमिक चौकशीनंतर बनावट शिधापत्रिका बनविणाऱ्या अज्ञात व्यक्तीविरुद्ध तहसीलदार सुचेता भामरे यांनी तक्रार दिली. या तक्रारीवरून सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. शिधापत्रिकेचे अर्ज सेतू कार्यालयात जमा होतात. त्यानंतर अर्जाची छाननी होऊन प्रशासकीय टिप्पणी केली जाते. टिप्पणी मंजूर झाल्यानंतर शिधापत्रिका तयार करून रजिस्टरला नोंद होऊन प्रशासकीय अधिकाऱ्याची त्यावर स्वाक्षरी केली जाते. त्यानंतर शिधापत्रिका वितरित होते. तहसीलदार कार्यालयात रमणसिंह यांच्या नावाने शिधापत्रिका वितरित झाल्याचे चौकशीत दिसून आले नाही. शिधापत्रिकेचा अर्ज प्राप्त झाल्याचीही नोंद नाही. तसेच शिधापत्रिकेवरील स्वाक्षरीही आपली नसल्याचे तहसीलदार भामरे यांनी म्हटले आहे.

Story img Loader