नवरात्रोत्सवानिमित्त सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात १०६ ठिकाणी दुर्गामातेची प्रतिष्ठापना करण्यात आली. त्याशिवाय अनेक देवींच्या मंदिरातही या उत्सवाचे थाटात पूजन करून भजनादी कार्यक्रम होणार आहेत.
नवरात्रोत्सव कालावधीत व त्यानंतर धम्मचक्र प्रवर्तन दिन, बकरी ईद, कोजागरी पौर्णिमा या उत्सवाच्या ४ ते २० ऑक्टोबर या कालावधीत सिंधुदुर्गात मनाई आदेश लागू करण्यात आले आहेत. त्याशिवाय अतिरिक्त पोलीस तैनात करण्यात आले आहेत.
सिंधुदुर्गात देवींच्या मंदिरात नवरात्रोत्सव साजरा करण्याची गावागावांत परंपरा आहे. पण गेल्या काही वर्षांत सार्वजनिक दुर्गामातेची मूर्ती प्रतिष्ठापना करून उत्सव साजरा करण्याची पद्धत सुरू झाली आहे. जिल्ह्यात १०६ ठिकाणी मूर्ती प्रतिष्ठापना झाली आहे.
जिल्ह्य़ात दुर्गामातेची मूर्ती प्रतिष्ठापना दोडामार्ग ६, बांदा ७, सावंतवाडी १६, कुडाळ १४, सिंधुनगरी ४, वेंगुर्ले ९, निवती ४, मालवण १३, आचरा ४, देवगड ७, विजयदुर्ग ३, कणकवली १३ व वैभववाडी ६ मिळून १०६ ठिकाणी हा उत्सव असणार आहे.
दुर्गामातेचा नवरात्रोत्सव सार्वजनिक स्वरूपाचा सुरू झाल्यापासून गुजरातचा गरबा नृत्यालाही या भागात पसंती मिळाली. दुर्गामातेसमोर गरबा नृत्य करणाऱ्या मंडळाच्या टीमची स्पर्धाही घेतली जाते. जिल्हाभरात गरबा नृत्याच्या विविध टीम ठिकठिकाणी पोहोचतात.
गौरी-गणपती सणानंतर नवरात्रोत्सव सुरू होतो, पण या सणापूर्वीच मंडळाचे कार्यकर्ते व गरबा नृत्य करणाऱ्या टीमचा सराव सुरू होतो. यंदा पावसाने रिपरिप सुरू केल्याने आनंदावर थोडेफार सावट आले आहे, पण नवरात्रोत्सव जिल्ह्य़ातील गावागावांत साजरा केला जातो.