सोलापूर : शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे नेते, रोजगार हमी योजना खात्याचे मंत्री भरत गोगावले यांच्या सोलापूर दौऱ्यात त्यांच्या समक्ष पक्षाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांमध्ये वादाचा प्रकार झाला. हे प्रकरण थेट पोलीस ठाण्यात गेले. यात एका पदाधिकाऱ्यांसह पाचजणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. मंत्री गोगावले हे सोलापूर दौऱ्यावर आले होते. यानिमित्ताने त्यांनी पक्षाचे जिल्हाप्रमुख मनीष काळजे यांच्या सात रस्त्यावरील कार्यालयात सदिच्छा भेट दिली. त्यावेळी गोगावले हे प्रसार माध्यमांशी बातचित करीत असताना पक्षाचे दुसरे पदाधिकारी, शहर प्रमुख मनोज शेजवाल हे शासकीय विश्रामगृहात मंत्री गोगावले यांना येण्यास उशीर होत असल्याने काळजे कार्यालयात आपल्या समर्थकांसह आले.

मंत्री गोगावले यांना शासकीय विश्रामगृहात येण्यास उशीर होत असल्याबद्दल शेजवाल यांनी मनीष काळजे यांना जाब विचारला. त्यावेळी दोघांत शाब्दिक बाचाबाची झडत असताना मंत्री गोगावले तेथेच होते. त्यांच्यासमोर काळजे आणि शेजवाल यांच्यात शिवीगाळ आणि दमदाटी होऊन थेट हाणामारीपर्यंत मजल गेली. गोगावले यांनी हस्तक्षेप करून दोघांना आवरले.

तथापि, नंतर मनीष काळजे यांनी सदर बझार पोलीस ठाण्यात धाव घेऊन मनोज शेजवाल यांच्यासह त्यांचे सहकारी शिवसैनिक समर्थ बिराजदार, सागर सोलापुरे, उमाकांत कारंडे, राजू शिंदे आदींविरुद्ध फिर्याद दाखल केली. शेजवान व इतरांनी आपणास शिवीगाळ करून मारहाण केली आणि जिवे ठार मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. तथापि, शेजवाल यांनी आपल्यावरील आरोप फेटाळले आहेत. काळजे यांना आपण अजिबात शिवीगाळ आणि मारहाण केली नाही. गोगावले हे शासकीय विश्रामगृहात आल्यानंतर त्यांचा सत्कार करावयाचा होता. परंतु गोगावले हे जिल्हाप्रमुख काळजे यांच्या संपर्क करण्यात उशिरापर्यंत बसल्यामुळे त्यांना शासकीय विश्रामगृहात लवकर पाठवण्याची विनंती काळजे यांना करण्यासाठी आपण गेलो होतो. परंतु गैरसमजातून किरकोळ वाद झाला, असा दावा शेजवाल यांनी केला आहे.