लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सोलापूर : सोलापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या सोलापूर दौऱ्याला गुरूवारी पुन्हा गालबोट लागले. आमदार विकास निधीतून व्यायामशाळेसाठी मंजूर झालेला सात लाखांचा निधी व्यायमशाळा न बांधता परस्पर हडपण्यात आल्याच्या तक्रारीची दखल प्रशासन घेत नसल्याच्या निषेधार्थ एका तरूणाने पालकमंत्र्यांच्या वाहनांचा ताफा निघून जाताच स्वतः आत्मदहनाचा प्रयत्न केला. एका हातात पेटता टेंभा आणि दुसऱ्या हातात इंधनाचा डबा घेऊन, इंधन अंगावर ओतून आत्मदहनाचा प्रयत्न करीत असताना पोलिसांनी कौशल्य पणाला लावून त्या तरूणाला ताब्यात घेतल्यामुळे पुढील अनर्थ टळला.

दादासाहेब बबन कळसाईत (वय ३६, रा. टाकळी टेंभुर्णी, ता. माढा) असे या आंदोलक तरूणाचे नाव आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे सात रस्त्यावरील जिल्हा नियोजन भवनात जिल्हा नियोजन समितीची बैठक आटोपून सिध्देश्वर यात्रेनिमित्त होम मैदानावर आयोजिलेल्या राज्य कृषिप्रदर्शनाच्या उद्घाटनासाठी निघाले होते. तेव्हा नियोजन भवनाबाहेर रस्त्यावर दादासाहेब कळसाईत हे एका हातात पेटविलेला टेंभा आणि दुसऱ्या हातात इंधन भरलेला डबा घेऊन अचानकपणे प्रकटले. त्यांनी पालकमंत्र्यांच्या मोटारींचा ताफा अडविण्याचा प्रयत्न केला. आपल्या गावातील व्यायामशाळेसाठी मंजूर झालेल्या विकास निधीचा भ्रष्टाचार होऊनही संबंधितांवर कारवाई होत नसल्यामुळे निषेध म्हणून आत्मदहन करीत असल्याचे ते ओरडून सांगत होते. परंतु पोलिसांनी कौशल्याने परिस्थिती हाताळत कळसाईत यांना ताब्यात घेतले. त्यामुळे पुढील आनर्थ टळला.

आणखी वाचा-सांगली : अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपीला २२ वर्षांची शिक्षा

टाकळी टेंभुर्णी गावात माढ्याचे आमदार बबनराव शिंदे यांच्या आमदार विकास निधीतून व्यायामशाळा बांधण्यासाठी सात लाखांचा निधी मंजूर झाला होता. परंतु ही रक्कम कार्यकारी अभियंता माने, शाखा अभियंता निकम, उपअभियंता खरात आणि ठेकेदार जाधव या सर्वांनी उचलली आणि व्यायामशाळा न बांधता निधीचा अपहार केला, अशी तक्रार कळसाईत यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे दोन-तीनवेळा केली होती. परंतु दखल घेण्यात आली नसल्यामुळे त्यांनी आंदोलनही केले होते. त्याचीही दखल घेतली गेली नाही. त्यामुळे त्याच्या निषेधार्थ आत्मदहनाचे पाऊल उचलत असल्याचे कळसाईत हे सांगत होते.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: During guardian minister chandrakant patils visit to solapur young man attempted self immolation mrj
Show comments