महाविकास आघाडी सरकारच्या काळात मला तुरुंगात टाकण्याचा डाव होता, असा गंभीर आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. एवढंच नाही तर उद्धव ठाकरेंनीच मला मातोश्रीचे दरवाजे बंद केले. मात्र वहिनी मला परवा एका कार्यक्रमात भेटल्या होत्या तेव्हा मी म्हटलं की उद्धवजींना नमस्कार सांगा कारण मी त्या वृत्तीचा नाही असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. एबीपी माझाच्या माझा महाराष्ट्र माझं व्हिजन या कार्यक्रमातल्या मुलाखतीत त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.
काय म्हटलं आहे देवेंद्र फडणवीस यांनी?
उद्धव ठाकरे आणि तुमच्यात खूपच कटुता आली असा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आला. त्या प्रश्नाला उत्तर देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “माझ्याकडून कुठलंही वैर नव्हतं. पण मातोश्रीचे दरवाजे मला उद्धव ठाकरेंनी बंद केले. पाच वर्षे आम्ही सत्तेत होतो तरीही ते असं वागले. एवढंच नाही तर मी तुम्हाला हे सांगतो की मी राजकीय वैर ठेवणारा माणूस नाही.मात्र अडीच वर्षांचं महाविकास आघाडी सरकार असताना माझ्यावर केसेस टाकण्याचं, माझ्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचं, काहीही करून मला तुरुंगात टाकण्याचं टार्गेटच त्यावेळी सीपी असलेल्या संजय पांडे यांना दिलं होतं.
मी काहीही केलं नव्हतं
मी काहीही केलं नव्हतं त्यामुळे मला संजय पांडे अडकवू शकले नाहीत. मला तुरुंगात टाकण्याचे कुठलेही प्रयत्न सफल झाले नाहीत. महाविकास आघाडीमध्ये संजय पांडे यांना टार्गेट देण्यात आलं होतं. मात्र माझ्या विरोधात त्यांना काहीही सापडलं नाही. माझ्याकडून कुठलीही कटुता आजही नाही. राजकीय दृष्ट्या मी त्यांचा (उद्धव ठाकरे) विरोधक आहे. पण व्यक्तिगत पातळीवर काहीही वैर नाही असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
रश्मी वहिनींशी संवाद साधला
“परवा एका कार्यक्रमात मला रश्मीवहिनी भेटल्या. मी त्यांच्याशी बोललो, त्यांच्या बहिणीशीही बोललो. मी त्यांना हेदेखील सांगितलं की उद्धवजींना माझा नमस्कार सांगा. हे मी रश्मी वहिनींना सांगितलं कारण राजकीय दृष्ट्या मी उद्धवजींचा विरोधक आहे. पण महाराष्ट्राची संस्कृती वैर जपणारी नाही. मी त्या संस्कारांनीच वागतो” असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.