दसरा मेळाव्याच्या मुहुर्तावर भगवानगडावरील उत्सवादरम्यान कोणताही अनुचित प्रकार न घडल्याने मोठय़ा प्रमाणावर तैनात करण्यात आलेल्या पोलीस दलाने सुटकेचा निश्वास सोडला. गडावर भाविकांनी भगवानबाबांचा जयजयकार करत समाधीचे दशर्न घेतले. गडाचे महंत डॉ. नामदेवशास्त्री व ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्यातील वादाने गेल्या सुमारे २५ वर्षांची गडावरील दसरा मेळाव्याची परंपरा यंदा खंडित झाली, वादाच्या पाश्र्वभुमिवर गडावर अपेक्षित गर्दी उसळली नाही. वादातुन कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी महसुल व पोलीस प्रशासन मात्र सतर्क होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गडावर दसरा मेळावा घेण्यास नामदेवशास्त्री व जिल्हा प्रशासनाने मंत्री मुंडे यांना परवानगी नाकारल्याने ऐनवेळी मुंडे यांनी दसरा मेळावा भगवानबाबांच्या जन्मस्थानी, सावरगाव (जि. बीड) येथे मेळावा घेण्याचे जाहीर केले. दोघांच्या वादातुन, प्रथमच भगवानगडावर मुंडे यांच्या अनुपस्थितीत किती भाविक येणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष होते. आज, शनिवारी सकाळी १० पर्यंत गडावर काहीसा शुकशुकाट होता. प्रांताधिकारी विक्रम बांदल यांनी गडावर जमावबंदीचा आदेश लागू केला होता. पोलिसांनी गडापासुन दोन किमी अलिकडेच वाहनांची व्यवस्था केली होती, परिणामी भाविकांना पायपीट करत गडावर यावे लागले.

महसुल व पोलीस प्रसासनाने सतर्कता म्हणुन गडावर विक्रेत्यांना दुकाने लावण्यास मनाई केली, यापुर्वी गडावर येणारे भाविक भगवानबाबांच्या समाधीचे दशर्न घेतल्यानंतर भाजप नेते स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या सभेसाठी थांबत असल्याने गडावर मोठी गर्दी जमा झालेली दिसायची. मात्र यंदा सभा नसल्याने भाविक दशर्नानंतर गडावर थांबत नव्हते. त्यामुळेही गडावर गर्दी कमी जाणवत होती. दुपारनंतर मात्र गडावर चांगली गर्दी जमा होऊन दशर्नासाठी मंदिराच्या बाहेरपर्यंत रांग लागली होती.

गडावरील  शांततेमुळे मोठय़ा संख्येने तैनात असलेले पोलीस कर्मचारीही निवांतपणे बसलेले दिसले. काही जण तर मोबाईलवर गेम खेळाताना दिसत होते, दरवर्षीच्या उत्सवात महंत भाविकांना अवर्जुन भेटत मात्र त्यांनी आज भाविकांची भेट घेण्याचे टाळले. सावरगाव येथील पंकजा मुंडे यांच्या सभेस पाथर्डी व शेवगावमधील कार्यकर्ते रवाना झाले असल्याने दरवर्षीप्रमाणे गडावर जाणाऱ्या वाहनांवर मुंडेंचे फोटो व नाव तसेच गावोगावी लागणाऱ्या स्वागत कमानी दिसल्या नाहीत. गडावर गर्दी नाही हे प्रसिद्धी माध्यमांचे मत आहे, गड म्हणजे दुकानदारी नसून कमी ग्राहक की अधिक ग्राहक आले हे मोजमाप लावणे योग्य नसून गडावर सकाळपासूनच भगवानबाबांना मानणारे भाविक येत आहेत. गड हा केवळ भगवानबाबांचाच आहे हे आज सिद्ध झाले, अशी प्रतिक्रिया डॉ. नामदेवशास्त्री यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली.

 

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dussehra festival celebration in peace at bhagwangad