विश्वास पवार

लोणंद: संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्याचे सातारकरांनी मोठ्या जल्लोषात भक्तीमय वातावरणात स्वागत केले. टाळ मृदुंगाच्या गजरात आणि हरिनामाच्या जयघोषात मोठया आनंदाने आणि भक्तीमय वातावरणात सातारा जिल्ह्यात पाडेगाव येथे पाच दिवसांसाठी आगमन झाले. फडफडणाऱ्या भगव्या पताका, टाळ मृदुंगाचा गजर आणि हरिभजनात तल्लीन होऊन संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलीचा पालखी सोहळा भक्तीरसात चिंब होऊन गेला.

संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे सातारा जिल्ह्यात आगमन होताच पालकमंत्री शंभूराज देसाई, आमदार बाळासाहेब पाटील,आमदार मकरंद पाटील, आमदार दीपक चव्हाण, जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पुष्पहार अर्पण करुन प्रशासनाच्या वतीने स्वागत केले. नीरा नदीच्या तीरावर पाडेगाव येथे पालखी स्वागताच्या ठिकाणी सातारा पोलीस दलाच्या वतीने मानवंदना देण्यात आली.

आणखी वाचा-महर्षी वाल्मिकींच्या तपोभूमीत विसावला माऊलींचा पालखी सोहळा

तत्पूर्वी “नीरा भिवरा पडता दृष्टी, स्नान करिता शुद्ध सृष्टी. अंती तो वैकुंठप्राप्ती, ऐसे परमेशी बोलीला.” या अभंगाच्या ठेक्यात टाळ मृदुंगाच्या गजरात संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुकांना ‘माउली माउली’च्या जयघोषात जल तुषार आणि फुलांच्या वर्षावात पालखी सोहळ्यातील पहिले नीरास्नान घालण्यात आले.

नीरा नदीतील स्नानानंतर संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे सातारा जिल्ह्यातील पाडेगाव येथे मान्यवरांनी तसेच लाखो भाविकांनी दर्शन घेतले. माऊलीच्या दर्शनासाठी भाविकांनी एकच गर्दी केली होती. हरिनामाच्या गजरात आणि टाळ मृदुंगाच्या निनादात पालखी सोहळ्यात भाविक तल्लीन झाले होते. विविध विभागांचे सामाजिक संदेश देणारे फलक विशेष लक्ष वेधून घेत होते.

आणखी वाचा-पुणे : संभाजी ब्रिगेडचे संतोष शिंदे यांच्या विरोधात ‘त्या’ व्हिडीओ प्रकरणी गुन्हा दाखल

पालखी सोहळा लोणंद मुक्कामी शहराच्या वेशीवर आल्यावर नगरपंचायत व नागरिकांच्या वतीने मोठे स्वागत करण्यात आले. वाजत गाजत पालखी सोहळा पालखीतळावर आणण्यात आला. पालखी स्थानिक नागरिकांच्या खांद्यावर देण्यात आली. पालखी तळावर पालखी विसावल्यानंतर चोपदारांनी चोप उंचावला आणि सर्वत्र एकच शांतता पसरली. यानंतर योग्य त्या सूचना देण्यात आल्या सायंकाळची शेजारती झाली आणि वारकरी आपल्या मुक्कामाच्या ठिकाणाकडे वळाले. पालखी सोहळा पुढील दोन दिवस लोणंद मुक्कामी असणार आहे.

Story img Loader