डहाणू, तलासरीत पुन्हा भूकंपाचे धक्के

पालघर जिल्ह्यातील डहाणू आणि तलासरी परिसर गुरुवारी सकाळी पुन्हा भूकंपाच्या धक्क्यांनी हादरला. गेल्या तीन महिन्यांपासून येथे नेहमीच भूकंपाचे धक्के बसत असून रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे. रहिवाशांना कडाक्याच्या थंडीत रात्री घराबाहेर काढावी लागत असून शासकीय यंत्रणा कुचकामी ठरल्याचा आरोप करण्यात आला आहे. सुरक्षितस्थळी हलवण्याची मागणी येथील रहिवाशांनी केली आहे.

गुरुवारी सकाळी ९.१३ आणि ९.१५ वाजता डहाणू व तलासरी परिसरात भूकंपाचे धक्के बसले. या भूकंपाची तीव्रता ३.४ रिश्टर स्केल अशी नोंदवण्यात आली. गेल्या तीन महिन्यांपासून या परिसरात भूकंपाचे धक्के बसत आहेत. या धक्क्यांची तीव्रता १.१ ते ३.६ रिश्टर स्केल आहे. तीव्रता कमी असली तरी गेल्या दोन महिन्यांपासून भूगर्भातील हालचालींचे गडगडाटी आवाज येत असून ते अद्यापही सुरूच आहेत, असे येथील रहिवाशांनी सांगितले. मुंबई-अहमदाबाद महामार्गालगतचा हा संपूर्ण भाग आदिवासीबहुल आहे. परिणामी, त्या भागातील पक्या घरांच्या भिंतीना, इमारतींना तसेच कुडाच्या घरांना कमी-अधिक प्रमाणात तडे गेलेले आहेत. या भूकंपाच्या सततच्या घटनांमुळे कोणतीही जीवितहानी झालेली नाही, असे महसूल, मदत व पुनर्वसन यंत्रणेकडून सांगण्यात येते.

भूंकपाच्या सततच्या धक्क्यांमुळे रहिवासी घाबरून दिवसरात्र घराबाहेरच असतात. सध्या रात्री थंडीची हुडहुडी आणि दिवसा उन्हाचा चटका अंगावर झेलत जगण्याची वेळ आबालवृद्धांवर आली आहे. सरकारी यंत्रणेने भूकंपाच्या धक्क्यांची मालिका पाहता त्या भागातील नागरिकांना रात्री घराबाहेरच झोपण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

डहाणू तालुक्यातील धुंदलवाडी, मोडगाव, बहारे, सासवंद, हळदपाडा, दापचरी, वंकास, चिंचले, पारडी, आंबोली, बोर्डी, वरखंडे, खुबारे आणि तलासरी तालुक्यातील सवणे, वडवली, करजगाव, झाई, नरेशवाडी, ब्राम्हणवाडी, धामणगाव, गांगणगाव, जितगाव, तलोठे, पुंजावे, गुजरात सीमेवरील कोचाई, उपलाट अशी भूकंपग्रस्त गावे आहेत. भूकंपाच्या धक्क्य़ांमुळे त्या भागातील लोकांच्या रोजंदारीवर परिणाम झाला आहे. सुरक्षिततेसाठी घराबाहेर राहणाऱ्या लोकांना दोन वेळच्या अन्नासाठी सरकारने अद्याप धान्यपुरवठा केलेला नाही. मात्र, भूकंपाच्या धक्क्यापासून कसा बचाव करावा, यासाठी सरकारमार्फत जनजागृती करण्यात येत आहे.

भूकंपाच्या धक्क्यांची नोंद करण्यासाठी धुंदलवाडी ते सासवंद दरम्यान वेदांत रुग्णालयाच्या आवारात भूकंपमापक यंत्रणा बसविण्यात आली. कमी तीव्रतेचे धक्के अजूनही जाणवत असून त्याची नोंद होत असल्याचे माहिती नवी दिल्लीतील हवामान विभागाचे शास्त्रज्ञ कमलेश चौधरी यांनी या परिसराच्या भेटीदरम्यान दिली.

या भागात वारंवार भूकंपाचे धक्के बसत असून घराबाहेर राहणेही अवघड झाले आहे. आमच्यावर गाव सोडून स्थलांतरित होण्याची वेळ आली आहे, तरी प्रशासनाने सुरक्षितस्थळी हलवण्याची सोय करावी.

– वसंत कोम, रहिवासी.

Story img Loader