बुधवारी दिवसभरात पाच सौम्य धक्के

कासा : डहाणू व तलासरी तालुक्यात भूकंपाच्या धक्क्यांची मालिका सुरूच आहे. बुधवारी दिवसभरात भूकंपाचे पाच सौम्य धक्के बसले. सकाळी १०.४४ वाजता झालेल्या भूकंपाची नोंद ३.१ रिश्टर स्केल अशी होती.

भूकंपतज्ज्ञांनी या परिसरात अभ्यास केल्यानंतर या भागातून फॉल्ट लाइन असल्याचे आढळून आले. जमिनीच्या सात स्तरांवर या हालचाली होत असल्याने हे भूकंपाचे धक्के जाणवत असल्याचा निष्कर्ष त्यांनी दिला. यापुढेही भूकंपाचे धक्के जाणवत राहतील, अशी माहिती त्यांनी आढावा बैठकीत दिली. पालघरमध्ये सातत्याने होणाऱ्या भूकंपामुळे जिल्हा प्रशासनाने मुंबई आयआयटी तज्ज्ञांना आणि भूगर्भीय तज्ज्ञांना बोलावले होते. त्यांनी या परिसरात अभ्यास केला आणि येथील घरे भूकंपरोधक नसल्याचे सांगितले. ही घरे प्रशिक्षित गवंडय़ांमार्फत तयार केली नसल्याने ती व्यवस्थित बांधलेली नाहीत, असे तज्ज्ञांनी सांगितले. त्यामुळे या धोकादायक घरांची तातडीने दुरुस्ती करण्यात येईल, असे जिल्हा प्रशासनाने म्हटले आहे. यासाठी आपत्ती व्यवस्थापनाच्या निधीतून तरतूद करण्यात आल्याचे समजते.

येथे सातत्याने होत असलेले भूकंप पाहता यापुढे शासनामार्फत देण्यात येणारी घरे भूकंपरोधक असतील, अशी माहिती जिल्हाधिकारी प्रशांत नारनवरे यांनी भूकंपबाबतच्या आढावा बैठकीत नुकतीच दिली. त्यासाठी राज्य शासन विशेष निधीची तरतूदही करणार असल्याचे त्यांनी म्हटले होते.

दरम्यान, शिवसेना नेते आणि सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांनी डहाणू तालुक्यातील हळदपाडा या ठिकाणी भेट दिली आणि आठ तंबूंचे वाटप केले.

शाळेला सुटी

धुंदलवाडीतील जिल्हा परिषद शाळेचे जवळपास २५९ विद्यार्थी शाळेबाहेरील शेडमध्ये शिक्षण घेत आहेत. सकाळी बसलेल्या भूकंपाच्या धक्क्यानंतर शाळा व्यवस्थापन समितीची बैठक घेऊन त्यानंतर शाळेला सुटी देण्यात आली. शाळेतील विद्यार्थी हे घाबरलेल्या अवस्थेत असून खबरदारीचा उपाय म्हणून अनेक वेळा मागणी करूनही या शाळांना शासनाकडून तंबू देण्यात आलेले नाहीत. ‘खबरदारीचा उपाय म्हणून आम्ही शासनाकडे तंबूची मागणी केली होती. परंतु आम्हाला तंबू देण्यात आलेले नाही. ज्या वेळी भूकंपाचे धक्के जाणवत असतात, त्या वेळी विद्यार्थी घाबरून वर्गाच्या बाहेर पळतात. आज भूकंपाचे धक्के बसल्यानंतर शाळा व्यवस्थापन समितीची सभा घेऊन शाळेला सुटी देण्यात आली, असे या शाळेच्या मुख्याध्यापिका स्मिता पागधरे यांनी सांगितले.

‘एनडीआरए’चे पथक माघारी

डहाणू : भूकंपाच्या परिस्थितीशी सामना करण्यासाठी आणि जनतेला मदत करण्यासाठी सरकारकडून आलेली राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन दलाची (एनडीआरए) तुकडी माघारी पाठवण्यात आली. या तुकडीत ३१ जवान होते आणि ११ दिवस ते भूकंपग्रस्त भागांत होते. आता नागरी संरक्षण दलाच्या १४ जवानांची तुकडी आणि राज्य राखीव दलाच्या १५ जणांची तुकडी डहाणू येथे पाठवण्यात आली आहे. आत्कलीन परिस्थिती उद्भवल्यास २९ जवान डहाणू आणि  तलासरी या दोन तालुक्यांतील २३ ग्रामपंचायत परिसरात कार्यरत राहणार आहेत. ‘एनडीआरए’चे पथक परत गेले असून त्याबदल्यात दुसरे पथक पाठवले आहे. राज्य राखीव दलाची एक तुकडीही तैनात आहे, असे डहाणूतील प्रांत अधिकारी सौरभ कटियार यांनी सांगितले.

भूकंपग्रस्तांना तंबूचे वाटप करण्यासाठीचा प्रस्ताव शासनाला पाठवण्यात आला आहे. लवकरात लवकर या ठिकाणी तंबू लावले जातील, तसेच उपाययोजनाही केल्या जात आहेत.

– सौरभ कटियार, प्रांताधिकारी

Story img Loader