नक्षलवादी चळवळीच्या बीमोडासाठी पूर्व विदर्भात तैनात करण्यात आलेल्या पोलीस दलाच्या कारवाईचा आलेख गेल्या तीन वर्षांच्या तुलनेत यंदा प्रथमच उंचावला आहे. पोलीस व सुरक्षा दलांच्या सक्रियतेमुळे यंदा हत्यांच्या प्रमाणातसुद्धा बरीच घट झाली आहे. या कामगिरीमुळे नक्षलवादी प्रथमच बॅकफूटवर गेले आहेत.
छत्तीसगड, आंध्र प्रदेश व मध्य प्रदेशच्या सीमेला लागून असलेल्या पूर्व विदर्भातील गडचिरोली व गोंदिया जिल्हय़ात सक्रिय असलेल्या नक्षलवादी चळवळीचा बीमोड करण्यासाठी केंद्र व राज्य शासनातर्फे गेल्या अनेक वर्षांपासून नक्षलवादविरोधी मोहीम राबवण्यात येत आहे. या मोहिमेंतर्गत सुमारे ७ हजार जवान या सीमावर्ती भागात तैनात करण्यात आले आहेत. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत काम करणाऱ्या या जवानांना रोज शस्त्रांसोबतच मानसिक पातळीवरचे युद्धसुद्धा लढावे लागते. अलीकडच्या काही वर्षांत या युद्धात पोलीस व सुरक्षा दलांच्या जवानांची कायम पीछेहाट होत राहिली आहे. घनदाट जंगल असलेल्या या भागात गनिमी काव्यात तरबेज असलेले नक्षलवादी नेहमी या युद्धात वरचढ ठरण्यात यशस्वी ठरले आहेत. या पाश्र्वभूमीवर आता संपत असलेल्या वर्षांत पोलीस दलाने मिळवलेले यश सर्वाचे लक्ष वेधून घेणारे ठरले आहे. या वर्षांत पोलीस व नक्षलवाद्यांमध्ये तब्बल ३८ चकमकी झाल्या. यात बारा नक्षलवादी ठार झाल्याचा पोलिसांचा दावा आहे. यापैकी एका चकमकीत पोलिसांना एका महिला नक्षलवाद्याचा मृतदेह ताब्यात घेण्यात यश मिळाले. हे वर्ष संपायला अजून दोन आठवडे शिल्लक आहेत. सध्याची पोलिसांची शोध मोहिमेची गती बघता चकमकीच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता गडचिरोलीचे पोलीस उपमहानिरीक्षक रवींद्र कदम यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना व्यक्त केली.
२०११ मध्ये पोलीस व नक्षलवाद्यांमध्ये केवळ १५ चकमकी झाल्या. २०१० मध्ये ही संख्या १४ होती. २००९ मध्ये ३५ तर २००८ मध्ये २५ चकमकी झाल्या. २००७ मध्ये हा आकडा ४४ होता. यानंतर चकमकींची संख्या कमी होत गेली. यंदा प्रथमच त्यात वाढ झाली आहे. २००९ मध्ये नक्षलवाद्यांनी ५४ पोलिसांना ठार केले होते. यामुळे पोलिसांचे मनोधैर्य कमालीचे खचले होते. आता त्यातून पोलीस बाहेर पडल्याचे या वर्षीच्या सक्रियतेवरून स्पष्ट झाले आहे. पोलिसांची सक्रियता वाढली की नक्षलवादी सामान्य माणसांना पोलीस खबरे ठरवून ठार मारण्याचा कार्यक्रम मोठय़ा प्रमाणावर हाती घेतात. हे समीकरण लक्षात घेतले तर यंदा नक्षलवाद्यांकडून हत्येचे प्रमाणसुद्धा बरेच घटले आहे. या वर्षांत नक्षलवाद्यांनी आतापर्यंत २१ व्यक्तींना ठार केले. यात प्रामुख्याने स्थानिक लोकप्रतिनिधी आहेत. २०११ मध्ये २९, २०१० मध्ये २७, २००९ मध्ये ३६, २००८ मध्ये १४ तर २००७ मध्ये २० व्यक्तींना नक्षलवाद्यांनी ठार केले होते. त्या तुलनेत यंदा हत्येचे प्रमाण बरेच कमी आहे. २००९ मध्ये नक्षलवाद्यांनी पोलिसांसोबतच सर्वाधिक सामान्य माणसांना ठार केल्याचे या आकडेवारीवरून स्पष्ट होते. ही आकडेवारी गडचिरोली व गोंदिया या दोन्ही जिल्हय़ांतील घटनांवर आधारित आहे.
गडचिरोलीत सक्रिय असलेल्या दिवाकरचा मृत्यू, नर्मदा व भास्करचे ठार होणे, शेखरचे आत्मसमर्पण यामुळे नक्षलवाद्यांना या वर्षांत आतापर्यंत तरी मोठी हिंसक कारवाई घडवून आणता आली नाही. पोलीस तसेच केंद्रीय सुरक्षा दलाच्या सक्रियतेमुळे नक्षलवादी बॅकफूटवर गेल्याचे स्पष्ट झाले आहे. गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक सुवेझ हक व गोंदियाचे डॉ. दिलीप झळके यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी केलेली ही कामगिरी गृहखात्याला समाधान देणारी ठरली आहे.
पूर्व विदर्भात नक्षलवादी बॅकफूटवर
नक्षलवादी चळवळीच्या बीमोडासाठी पूर्व विदर्भात तैनात करण्यात आलेल्या पोलीस दलाच्या कारवाईचा आलेख गेल्या तीन वर्षांच्या तुलनेत यंदा प्रथमच उंचावला आहे. पोलीस व सुरक्षा दलांच्या सक्रियतेमुळे यंदा हत्यांच्या प्रमाणातसुद्धा बरीच घट झाली आहे. या कामगिरीमुळे नक्षलवादी प्रथमच बॅकफूटवर गेले आहेत.
First published on: 17-12-2012 at 02:52 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: East vidarbha area naxal on back foot