विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील जनतेने सत्ताधाऱ्यांच्या विरोधात कौल दिला. राज्यात सत्ताधाऱ्यांच्या विशेषत: राष्ट्रवादीच्या विरोधात वातावरण होते, मात्र अकोल्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार वैभव पिचड यांनी पदार्पणातच वीस हजाराचे मताधिक्य घेत विधानसभेत पहिले पाऊल टाकले. सलग सात निवडणुकांमध्ये विजय मिळविणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मधुकरराव पिचड यांनी तालुक्यावरील आपली राजकीय पकड मजबूत असल्याचे पुन्हा एकदा सिध्द केले. अर्थात त्यांच्या या यशाला बहुरंगी लढतीने हातभार लावला.
राष्ट्रवादीच्या विरोधात एकास एक समर्थ पर्याय देण्यात पिचड विरोधकांना अपयश आले. पिचड विरोधी मतांमधील ही फूट सत्ताधाऱ्यांच्या पथ्यावर पडली. मोठे कार्यकर्ते नाही, पक्षाचे म्हणावे असे संघटन नाही, साधनांची कमतरता, मोठय़ा सभा नाहीत, आक्रमक प्रचार यंत्रणा नाही, पक्षाची म्हणावी अशी साथ नाही. तिकिट मिळविण्यापासून सुरु असणारी अडथळ्यांची शर्यत मतदानापर्यंत सुरुच होती. तरीही शिवसेनेचे उमेदवार मधुकर तळपाडे यांनी जी लक्षणीय मते मिळविली ती अनेक राजकीय पंडितांचे अंदाज चुकविणारी ठरली. त्यांना मिळालेली मते ही अकोले तालुक्याच्या मानसिकतेचे निर्देशकच म्हणावी लागतील.
यावेळी अकोले मतदार संघात बहुरंगी लढत झाली. राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भाजप, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि काँग्रेस या राज्यातील प्रमुख पक्षांचे उमेदवार लढतीत होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे वैभव पिचड यांनी ६७ हजार ६९७ मते मिळवत शिवसेनेचे उमेदवार मधुकर तळपाडे (मते ४७ हजार ६३४) यांचा वीस हजारापेक्षा अधिक मताधिक्क्याने पराभव केला. तळपाडे यांचा हा सलग दुसरा पराभव. प्रत्येकवेळी वेगळे चिन्ह घेऊन उभे राहणारे अशोक भांगरे यावेळी भाजपचे उमेदवार होते. त्यांना फक्त २७ हजार ४४६ मते पडली व ते तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नामदेव भांगरे यांनी ११ हजार ८६१ मते मिळविली. जेमतेम सव्वाचार हजार मते मिळविणाऱ्या काँग्रेस उमेदवाराची अनामत रक्कमही अपेक्षेप्रमाणे जप्त झाली. ही निवडणूक म्हणजे २००९ च्या निवडणुकीचीच जणू पुनरावृत्ती ठरली. त्यावेळीही भांगरे-तळपाडे यांची एकत्रित मते या निवडणुकीप्रमाणेच राष्ट्रवादीपेक्षा जास्त होती. मात्र या दोन उमेदवारांतील मतविभागणीचा लाभ राष्ट्रवादीला झाला. भांगरे यांचा हा सलग सहावा पराभव.
पिचड यांच्याबद्दल जसा रोष जनतेमध्ये काही प्रमाणात आढळतो तसाच रोष आता भांगरे यांच्याबद्दलही आढळून येऊ लागला आहे. त्यामुळे पिचड-भांगरे नकोच असे म्हणणारे तिसऱ्या पर्यायाच्या शोधात आहेत, मात्र असा एक समर्थ पर्याय या निवडणुकीतही मिळू शकला नाही. आपण विजयाच्या स्पर्धेत असल्याची भावना जनतेत निर्माण करण्यात सेनेचे उमेदवार तळपाडे यांना यश आले नाही, त्यामुळेच राजकीयदृष्टय़ा जागृत असणाऱ्या प्रवरा खोऱ्यातही शिवसेना की भाजप यापैकी कोणाच्या मागे उभे रहायचे मतदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला. त्यामुळे पिचड विरोधी मतांची फूट या भागात मोठय़ा प्रमाणात झाली. त्याचा फटका तळपाडे यांना बसला. गेली अनेक वर्षे तालुक्यावर एकहाती वर्चस्व गाजविणारे मधुकरराव पिचड या निवडणुकीत उमेदवार नव्हते. त्यामुळे एक मोठे राजकीय स्थित्यंतर निवडणुकीत झाले आहे. पण या स्थित्यंतरानंतरही तालुक्याची सत्ता प्रस्थापितांच्या घराण्यात शाबूत राहिली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा