EC Writes to BJP and Congress’s Chairperson : महाराष्ट्र आणि झारखंडमधील विधानसभा निवडणुकीत आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी भाजपाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना निवडणूक आयोगाने नोटीस पाठवली आहे. निवडणूक आयोगाने या दोन्ही नेत्यांकडून उत्तरे मागितली आहे. एएनआयने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भाजपाने राहुल गांधींविरोधात तक्रार केली होती, तर काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. निवडणूक आयोगाने दोन्ही पक्षांकडून सोमवार, १८ नोव्हेंबर रोजी दुपारी १ वाजेपर्यंत उत्तरे मागितली आहेत. स्टार प्रचारक आणि इतर नेत्यांवर वचक ठेवण्याबाबात निवडणूक आयोगाने दोन्ही पक्षांना लोकसभा निवडणुकीवेळीही तंबी दिली होती. याचीही आठवण निवडणूक आयोगाने करून दिली.

हेही वाचा >> Priyanka Gandhi : भावाला दिलेलं चॅलेंज बहिणीने पूर्ण केलं; बाळासाहेब ठाकरेंचा उल्लेख करत प्रियांका गांधींचं मोदी-शाहांना प्रतिआव्हान

भाजपा संविधान नष्ट करणार असल्याचा अपप्रचार काँग्रेसकडून केला जात असल्याची तक्रार भाजपाच्या नेत्यांनी निवडणूक आयोगाला केली होती. तर, भाजपाचे दोन ज्येष्ठ नेते विभाजन, खोटे आणि द्वेषपूर्ण भाषण करत असल्याचा दावा करत काँग्रेसने निवडणूक आयोगात धाव घेतली होती. या दोन्ही तक्रारींची दखल घेऊन निवडणूक आयोगाने दोन्ही पक्षांच्या अध्यक्षांना नोटीस बजावल्या आहेत. त्यानुसार, त्यांना १८ नोव्हेंबरपर्यंत उत्तरे पाठवायची आहेत.

महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये निवडणुका

दरम्यान, झारखंडमध्ये आणि महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकी लागल्या आहेत. झारखंडमध्ये ३८ जागांसाठी आणि महाराष्ट्रात २८८ जागांसाठी बुधवार २० नोव्हेंबरला मतदान होणार आहे. तर, दोन्ही ठिकाणी २३ नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे.

आचारसंहिता भंग होण्याच्या तक्रारींमध्ये वाढ

विधानसभा निवडणूका जाहीर होताच १५ ऑक्टोबर पासून आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. या काळात आचारसंहितेचा भंग होऊ नये यासाठी जिल्हा निवडणूक विभाग सज्ज झाला आहे. सत्ताधारी आणि विरोधकांच्या आरोप प्रत्यारोपांमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे दिसत आहे. या मिरवणूक, सभा आणि मेळाव्यांमध्ये एखाद्या पक्षाकडून किंवा उमेदवारांकडून आचारसंहितेचा भंग होत असल्याचे निदर्शनास आल्यास याची तक्रार सि-व्हीजील ॲपवर करता येत आहे. प्रचारात काही अनियमितता आढळून आल्यास नागरिक त्या प्रकरणाचा संदेश, फोटो, व्हिडिओ या ॲपवर शेअर करत आहेत. गेल्या काही दिवसात आचारसंहितेचा भंग होण्याच्या तक्रारींमध्ये वाढ झाल्याचे दिसत आहे. १५ ऑक्टोबर म्हणजेच आचारसंहिता लागू झाल्यापासून ते १४ नोव्हेंबर या महिन्याभराच्या कालावधीत ठाणे जिल्ह्यात १ हजार २०१ तक्रारी या ॲपवर प्राप्त झाल्या आहेत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ec writes to bjp and congress chairperson over violetion of model code of conduct in maharashtra election 2024 sgk