कराड : बँकिंग व अर्थकारणातील गाढे अभ्यासक, युनायटेड वेस्टर्न बँकेचे माजी अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी प्रभाकर नारायण तथा पी. एन. जोशी यांचे मंगळवारी सकाळी सातारमध्ये राहत्या घरी निधन झाले. ते ८९ वर्षांचे होते. त्यांच्या मागे एक मुलगा व मुलगी असा परिवार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कर्नाटकातील चिक्कोडी हे जोशी यांचे मूळ गाव. त्यांचे प्राथमिक शिक्षण चिक्कोडीत तर माध्यमिकपर्यंतचे बेळगावात शिक्षण झाले. पुढे मुंबई विद्यापीठातून त्यांनी अर्थशास्त्र आणि इतिहास विषयाची द्विपदवी घेतली. यानंतर त्यांनी रिझर्व्ह बँकेत अर्थशास्त्र विभागात १५ वर्षे अधिकारी म्हणून नोकरी केली. बँक ऑफ इंडियाचे ते महाव्यवस्थापकही होते.

शिक्षण,दिर्घ अनुभव आणि अभ्यासपूर्ण कामकाजाची दखल घेऊन रिझर्व्ह बँकेने त्यांची सातारची ओळख असलेल्या युनायटेड वेस्टर्न बँकेचे अध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून पी. एन. जोशी यांच्यावर नव्वदच्या दशकात जबाबदारी सोपवली. बँकिंग विश्वातील जाणकार अशी सर्वदूर ओळख असलेल्या पी. एन. जोशी बँकिग व अर्थकारणा विषयीची अनेक पुस्तके मराठी व इंग्रजीमधून प्रसिध्द आहेत. त्यांची काही पुस्तके प्रचंड गाजली. खासगी बँक संघटनेचे ते पहिले अध्यक्ष होते.

सरकारच्या बँकिंग व आर्थिक धोरणांवर ते विविध वृत्तपत्रात लिहीत असतं. युनायटेड वेस्टर्न बँकेचे नेतृत्व करताना त्यांनी या बँकेला अत्याधुनिक तंत्रज्ञानाने परिपुर्ण बनवले. बँकेच्या कामकाजात अभ्यासपूर्ण बदल करताना अनेक उपक्रमही राबवले. सारस्वत बँकेचे संचालक म्हणूनही त्यांनी काम पाहिले. ते विमामहर्षी अण्णासाहेब चिरमुले न्यासाचे प्रमुख विश्वस्त व पी. एन. जोशी चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष होते. साताऱ्यातील अनेक संस्था, विविध क्षेत्रातील मान्यवरांशी त्यांचा स्नेह होता. विविध महाविद्यालयात ते मार्गदर्शक म्हणूनही कार्यरत राहिले होते. त्यांच्या निधनाने बँकिंग क्षेत्रातील अभ्यासू व्यक्तिमत्त्व हरपल्याचे दुःख व्यक्त होत आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Economist and former chairman of the united western bank np joshi passes away in satara hrc
Show comments