हिंगोली : कोणत्याही मोठ्या उद्योगाविना चालणाऱ्या हिंगोली जिल्ह्याच्या अर्थकारणाची दशा नि दिशा हळद आणि ऊस यांच्याभोवती. २०२२मध्ये हळदीने हात दिला नि जिल्ह्याच्या आर्थिक प्रगतीने मोठी मजल मारली. पण गेल्या वर्षी हळदीचे दर घसरले आणि हिंगोलीच्या गाड्याचे चाक जागीच रुतले. निवडणूक वर्षातल्या आचारसंहितेने रस्तेबांधणीला ‘ब्रेक’ लावल्याने प्रगतीची गाडी आणखी गडगडली.
कोविडकाळात हळदीची मागणी वाढल्यानंतर २६६ किलोमीटरचा नदीकिनारा लाभलेल्या हिंगोली जिल्ह्यात हळद हेच बागायत पीक झाले. कयाधूच्या ८० किलोमीटरच्या पट्ट्यात अधिक. त्यामुळे सारे अर्थकारण हळद आणि ऊस या पिकांभोवती केंद्रित झालेले. हिंगोलीमध्ये २४ हजार हेक्टरवर हळद लावली जात असे. त्या क्षेत्रात आता मोठी वाढ झाली आहे. कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार आता ३२ हजार हेक्टरवर हळदीचे पीक घेतले जाते. हळद वाढली पण भाव गडगडले. परिणामी सारे अर्थकारण घसरले. उसाची उत्पादकता घसरली आणि हळदीचे दर. त्यात सिंचनाचा अनुशेषही शिल्लक आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हिंगोली जिल्ह्यात एकही मोठा उद्योग नाही. सारी भिस्त छोट्या उद्याोग-धंद्यांवरच. आतापर्यंत नोंदल्या गेलेल्या उद्याोगांची संख्या फक्त ३९ इतकी आहे. त्यातही जिनिंग, फॅब्रिकेशन आणि अन्न प्रक्रिया उद्याोग आहेत. त्यामुळे जिल्ह्यात बेरोजगारीचे प्रमाणही अधिक आहे.

२००१ ते २०२१ या दोन दशकांत २४३५ किलोमीटरचे रस्ते करण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले होते. त्यापैकी आतापर्यंत फक्त ६५० किलोमीटरचे रस्ते तयार करण्यात आले. यातील ग्रामीण भागातील रस्ते आहेत फक्त ४४९. एकूण रस्त्यांच्या चार हजार ८५१ किलोमीटरच्या लांबीमध्ये सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यांची लांबी फक्त २४५ किलोमीटर. समृद्धी महामार्ग झाल्याने हिंगोलीपर्यंत जाण्याचा वेग वाढला असला तरी कृषीमालाची ने-आण करण्यासाठी रस्ते बांधताच आले नाहीत. गेल्या वर्षी त्यात आचारसंहिता आणि अतिवृष्टीची भर पडली. हिंगोलीची गाडी हमरस्त्यावर येत नसल्याने सामाजिक प्रश्न डोके वर काढतात.

अगदी दहावीच्या परीक्षेत बसणाऱ्या मुलांची संख्या घसरली. १५ हजार पाचवीपर्यंत शाळेतील गळतीचे शेकडा प्रमाण ७.३१ वर आले. बहुतांश ग्रामीण भागातील पालकांचे दुर्लक्ष यामुळे शिक्षणातील प्रगती तशी कासवगतीची. गेल्या वर्षाभरात वैद्याकीय महाविद्यालय सुरू करण्यासाठी अधिकाऱ्यांना कमालीची कसरत करावी लागली. कौशल्य विकासाच्या योजनाही फारशा गतीने पुढे जाऊ शकल्या नाहीत. अगदी पंतप्रधान घरकुल योजनासुद्धा कमालीची संथपणे सुरू आहे. ४८ हजार ५७० घरकुले बांधायची होती. त्यापैकी ४३ हजार घरांसाठी मंजुरी मिळाली. मात्र, प्रत्यक्षात पूर्ण झालेल्या घरांची संख्या केवळ १७५० इतकी आहे.

पुढे जाण्याचा मार्ग कसा ?

गुरुत्वीय लहरींचा अभ्यास करण्यासाठी ‘लिगो इंडिया’चा प्रकल्प हिंगोली जिल्ह्यात घेतला जाणार आहे. हा प्रकल्प झाला तर काही नव्या आर्थिक घडामोडी घडतील, असा दावा प्रशासनाकडून केला जातो. हा प्रकल्प मंजूर झाल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली होती. त्यामुळे आता मागासपणाला गुरुत्वीय लहरीतून हिंगोलीकर उत्तर शोधत आहेत.