२०१९च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांपूर्वी ED नं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि राज्याचे सध्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत झालेल्या कथित २५ हजार कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. त्याचसंदर्भात आज ईडीनं मोठी कारवाई करत साताऱ्यातील जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्याची मालमत्ता, इमारत आणि जमीन जप्त केली आहे. सगळी जवळपास ६५ कोटी ७५ लाख रुपयांची मालमत्ता ईडीनं जप्त केली आहे. अजित पवार यांच्याशी संबंधित स्पार्कलिंग सॉईल प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा या व्यवहारातील सहभाग पाहाता संशयाची सूई खुद्द अजित पवार यांच्यापर्यंत पोहोचत असल्याचं आता बोललं जात आहे.
काय आहे प्रकरण?
२०१०मध्ये जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्याचा व्यवहार झाला होता. हा कारखाना महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने लिलाव करून गुरू कमॉडिटी सर्विसेस प्रायव्हेट लिमिटेडला विकला. हा व्यवहार बाजारभावापेक्षा अत्यंत कमी दरामध्ये झाला असून त्यासाठी घेण्यात आलेल्या लिलाव प्रक्रियेमध्ये नियमांचं पालन न केल्याचा आरोप ईडीनं केला आहे. त्या वेळी राज्याचे सध्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार राज्य सहकारी बँकेचे अध्यक्ष होते. मात्र हे प्रकरण इतक्यावरच थांबत नाही.
ED attaches properties of M/s Jarandeshwar Sahkari Sugar Karkhana situated at Chimangaon, Koregaon, Satara, Maharashtra worth Rs. 65,75,00,000/ under the provisions of the Prevention of Money Laundering, 2002 in a case related to Maharashtra State Co-operative Bank (MSCB): ED
— ANI (@ANI) July 1, 2021
अजित पवारांचा संबंध असल्याचा ईडीचा दावा
ईडीनं दिलेल्या माहितीनुसीर, गुरू कमॉडिटीजनं हा कारखाना लागलीच जरंडेश्वर शुगर मिल्स प्रायव्हेट लिमिटेडला लीजवर दिला. या कंपनीमध्ये स्पार्कलिंग सॉइल प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे बहुतांश शेअर आहेत. इथे पुन्हा अजित पवारांचा या प्रकरणात संदर्भ लागतो. स्पार्कलिंग सॉईल प्रायव्हेट लिमिटेड कंपनी अजित पवार आणि त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्याशी संबंधित असल्याचं ईडीचं म्हणणं आहे.
“ED चा तपास आता बारामतीच्या दिशेने जातोय…” ; भातखळकरांनी साधला निशाणा!
“जरंडेश्वर सहकारी साखर कारखाना खरेदी करण्यासाठी वापरण्यात आलेला बहुतांश पैसा हा स्पार्कलिंग सॉईल प्रायव्हेट लिमिटेड कंपनीकडून आला होता. ही कंपनी अजित पवार आणि त्यांच्या पत्नीशी संबंधित आहे”, असं ईडीकडून सांगण्यात आलं.
गुरू कमॉडिटी ही डमी कंपनी?
दरम्यान, २०१०मध्ये जरंडेश्वर साखर कारखाना खरेदी करणारी गुरू कमॉडिटी ही डमी कंपनी असल्याचा दावा ईडीनं केला आहे. जरंडेश्वक साखर कारखाना बळकावण्यासाठीच या कंपनीचा वापर करण्यात आला. त्यापुढे जाऊन जरंडेश्वर शुगर मिल्सकडून जरंडेश्वर साखर कारखान्याचा वापर पुणे जिल्हा सहकारी बँकेकडून ७०० कोटींचं कर्ज मिळवण्यासाठी करण्यात आल्याचा देखील दावा ईडीकडून करण्यात आला आहे.