सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) मुंबईत १५ ठिकाणी छापे टाकले आहेत. करोना केंद्रांसाठी देण्यात आलेल्या कंत्राटातील कथित गैरव्यवहार प्रकरणी हे छापे टाकण्यात आले असून शिवसेना खासदार संजय राऊत यांचे निकटवर्ती म्हणून ओळखले जाणारे सुजीत पाटकर यांच्या मालमत्तेवरही छापा टाकण्यात आला आहे. याशिवाय एका सनदी अधिकाऱ्यांच्या ठिकाणावरही ईडीने छापा मारल्याचे समजते. याप्रकरणी राज्याचे गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आज त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
“नेमकी काय कारवाई सुरू आहे हे मला माहिती नाही. पण निश्चितपणे सांगतो की ज्यावेळेस मुंबई महानगरपालिकेमध्ये कोविड सेंटर्स सुरू करण्यात आले. त्यानंतर कोविड सेंटरमधील घोटाळा बाहेर आला, त्यावेळी अतिशय धक्कादायक माहिती बाहेर आली होती. कोणताही अनुभव नसलेल्या कंपन्या तयार झाल्या होत्या. लोकांच्या जिवाशी अक्षरशः खेळण्यात आलं. पुण्यात तर एका पत्रकाराचाच मृत्यू झाला. त्यामुळे यासंदर्भातील चौकशी चालली आहे. ही चौकशी कुठपर्यंत पोहोचली, या छाप्यात काय मिळालं आहे हे ईडी सांगू शकेल. मला माहिती नाही, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
हेही वाचा >> मुंबईत १५ ठिकाणी ईडीचे छापे; करोना केंद्र कंत्राटातील कथित गैरव्यवहार प्रकरण
ईडीने मुंबईत १५ ठिकाणी छापे टाकले आहेत. यामध्ये संजय राऊत यांचे निकटवर्तीय सुजित पाटकर आणि आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय सुरज चव्हाण यांचाही समावेश आहे. यावरून आणखी किती लोकांची चौकशी सुरू आहे, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. त्यावर फडणवीस म्हणाले की, “ज्या लोकांचे कनेक्शन असतील त्यांची चौकशी सुरू असेल. यासंदर्भातील अधिकृत माहिती ईडी अधिकारीच देऊ शकतील.”
मुंबईत १५ ठिकाणी छापे
सुजीत पाटकर यांच्यासह आणखी तिघांविरोधात आझाद मैदान पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी याप्रकरणी ३८ कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याची तक्रार केली असून त्यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी ईडीने हे छापे मारले आहेत. संजय राऊत यांचे मित्र सुजित पाटकर याप्रकरणी रडारवर आले असून करोना केंद्रातील कंत्राटाप्रकरणी सुजित पाटकर आणि अन्य तिघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. किरीट सोमय्या यांच्या तक्रारीनुसार आझाद मैदान पोलीस ठाण्यात फसवणूक, बनावट कागदपत्र सादर करणे, फौजदार विश्वासघात केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोमय्या यांच्या तक्रारीनुसार, याप्रकरणी ३८ कोटी रुपयांची फसवणूक झाली आहे. याप्रकरणी लाईफ लाईन रुग्णालयाच्या व्यवस्थापन सेवेसह डॉ हेमंत गुप्ता, सुजित पाटकर, संजय शहा आणि राजू साळुंखे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे प्रकरण पुढील तपासासाठी आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आले होते.