गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीतील नेत्यांना केंद्रीय तपास यंत्रणांकडून त्रास दिला जात असल्याचा आरोप सातत्यानं केला जातोय. अशातच महाविकास आघाडीतील दोन नेत्यांना एकाच दिवशी अंमलबजावणी संचलनालयाने ( ईडी ) समन्स बजावलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार आणि शिवसेना ( ठाकरे गट ) नेत्या किशोरी पेडणेकर यांना ईडीनं चौकशीसाठी हजर राहण्यासाठी समन्स पाठवलं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांना २४ जानेवारीला चौकशीसाठी बोलावण्यात आलं आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या निगडीत प्रकरणाशी संबधित ही नोटिस बजावली आहे. दुसरीकडे, कथित बॉडी बॅग घोटाळ्याप्रकरणी किशोरी पेडणेकरांना २५ जानेवारीला चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश ईडीकडून देण्यात आले आहेत.
दरम्यान, कथित खिचडी घोटाळ्याप्रकरणी ठाकरे गटातील आमदार आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय सूरज चव्हाण यांना ईडीनं बुधवारी ( १७ जानेवारी ) अटक केली आहे. सूरज चव्हाण यांना २२ जानेवारीपर्यंत न्यायालयानं ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे.
तर, ठाकरे गटातील राजापूर-लांजा येथील आमदार राजन साळवी यांच्या घरी लाचलुचपत प्रतिबंध विभागानं ( एसीबी ) गुरूवारी ( १८ जानेवारी ) धाड टाकली होती. बेहिशोबी मालमत्ता जमा केल्याप्रकरणी राजन साळवी, पत्नी अनुजा आणि मुलगा शुभम विरोधात रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.