राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या कागल येथील निवासस्थानी अंमलबजावणी संचालनालयाने ( ईडी ) शनिवार ( ११ मार्च ) धाड टाकली होती. ईडीच्या पथकाने पहाटे मुश्रीफांच्या घरी धाड टाकलेली. तब्बल ९ तासांच्या तपासानंतर ईडीचे अधिकारी निवासस्थानाच्या बाहेर पडले होते. अशातच आता मुश्रीफांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. ईडीने हसन मुश्रीफ यांना समन्स बजावलं आहे.
हसन मुश्रीफ यांच्या कागल येथील निवासस्थानी ईडीने पहाटे धाड टाकली. ईडीच्या सात ते आठ अधिकाऱ्यांच्या पथकाने मुश्रीफांच्या घरी कागदपत्रांची तपासणी केली. ही माहिती मिळाल्यानंतर कोल्हापुरात एकच खळबळ उडाली. तर, धाडीनंतर कार्यकर्त्यांनी आक्रमक होत ईडी, भाजपा, किरीट सोमय्यांविरोधात घोषणाबाजी केली. तसेच, ९ तासांच्या तपासणीनंतर हे अधिकारी माघारी फिरले.
हेही वाचा : एकनाथ शिंदेंची पुन्हा शिवरायांबरोबर तुलना, जितेंद्र आव्हाडांची संतप्त प्रतिक्रिया; ट्वीट करत म्हणाले…
आता ईडीने हसन मुश्रीफ यांना समन्स बजावलं आहे. त्यानुसार हसन मुश्रीफांना पुढील आठवड्यात चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितलं आहे. त्यामुळे हसन मुश्रीफ पुढील आठवड्यात चौकशीसाठी हजर राहतात का? हे पाहवं लागणार आहे.
हेही वाचा : जळगाव जिल्हा बँकेत महाविकास आघाडीला मोठा धक्का! एकनाथ खडसेंचा काँग्रेस, ठाकरे गटावर आरोप; म्हणाले…
प्रकरण काय?
भाजपाचे नेते किरीट सोमय्यांनी २०२२ मध्ये मुश्रीफ यांच्याविरोधात ईडीकडे तक्रार केली होती. कोल्हापुरातील अप्पासाहेब नलावडे साखर कारखान्यात त्यांच्या एका नातेवाईकाच्या मालकीच्या आणि ताब्यात असलेल्या कंपनीच्या माध्यमातून १०० कोटी रूपयांचा भ्रष्टाचार केला आहे, असा आरोप किरीट सोमय्यांनी लावला होता. त्यानंतर तीन वेळा ईडीने मुश्रीफांच्या घरावर छापेमारी केली आहे.