गेल्या काही दिवसांपासून राज्यात केंद्रीय तपास यंत्रणांच्या राजकीय वापरावरून वादविवाद सुरू आहेत. शिवसेनेचे प्रवक्ते आणि आमदार प्रताप सरनाईक यांनी तपास यंत्रणांकडून होत असलेल्या त्रासबद्दलची खदखद मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे मांडली होती. या प्रकरणाच्या चर्चेवर पडदा पडत नाही, तोच आता माजी गृहमंत्री अनिल देशमुख प्रकरणात ईडीने कारवाई केल्यानं खळबळ उडाली आहे. अनिल देशमुख यांचे पीए संजीव पलांडे आणि कुंदन शिंदे यांना अटक करण्यात आले असून, आता देशमुख यांना समन्स बजावण्यात आलं आहे. याप्रकरणावरून शिवसेनेचे नेते संजय राऊत भाजपावर चांगलेच भडकले.
संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना राऊत म्हणाले, “देशात विरोधी पक्षांची मजबूत आघाडी बनण्याची तयारी सुरू आहे. पण ही आघाडी काँग्रेसशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. काँग्रेस असल्याशिवाय विरोधी पक्षांची आघाडी आकार घेऊ शकत नाही. शरद पवार यांचंही असंच म्हणणं आहे. काही दिवसांपूर्वी शिवसेनेनंही हेच म्हटलेलं आहे. काँग्रेसचे नेते दिनेश गुंडू राव यांनीही काल बोलताना शिवसेनेच्या भूमिकेचाच संदर्भ दिला आहे. देशातील विरोधक एकत्र आले, अर्थात काँग्रेससह तरच देशात सध्याच्या राजकीय व्यवस्थेत चांगला पर्याय उभा राहू शकतो,” असं मत राऊत यांनी मांडलं.
हेही वाचा- अनिल देशमुखांच्या अडचणीत वाढ!; पीए संजीव पलांडे व कुंदन शिंदे यांना अटक
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीने समन्स बजावलं आहे. देशमुख यांना चौकशीसाठी बोलावण्यात आलं असून, यासंदर्भात बोलताना राऊत म्हणाले,”बघावं लागेल. कालच बघितलं की, त्यांच्या घरांवर आणि कार्यालयावर धाडी टाकण्यात आल्या आहेत. शरद पवार यांनी कालच सांगितलं की, ‘निराशेतून हे केलं जात आहे. काही लोकांच्या मनात निराशा आहे. सरकार बनवू शकलो नाही, या अपयशामुळे नैराश्य आलेलं आहे.’ शरद पवार अगदी बरोबर बोलले. त्याच आधार सरकारमध्ये असलेल्या पक्षातील लोकांना त्रास देण्याचा प्रयत्न होतोय. महाराष्ट्रातील तपास यंत्रणा चांगल्या प्रकारे काम करून शकते. पण, महाराष्ट्रातील मंत्री असोत की, शिवसेनेचे मंत्री आणि आमदार तसेच राष्ट्रवादी आणि काँग्रेस आमदार… सर्वांना त्रास देण्याचा प्रयत्न… पण आम्ही बघून घेऊ,” असं संजय राऊत म्हणाले.