sachin waze approver : अनिल देशमुखांच्या कथीत वसुली प्रकरणातीलआरोपी सचिन वाझे याने माफीचा साक्षीदार होण्यासाठी पत्र ईडीला दिले होते. त्याला ईडीकडून मान्यता देण्यात आली आहे. तसेच यापूर्वी सीबीआयकडूनही वाझे यांना माफीचा साक्षीदार म्हणून मान्यता देण्यात आली होती.
”सचिन वाझे सर्व तथ्य आणि खरी माहिती सांगणार असेल तर माफीचा साक्षीदार होण्यास आमचा कोणताही आक्षेप नाही, असे ईडीकडून सांगण्यात आले आहे. तसेच गुन्ह्यातील तपासाच्या कोणत्याही टप्प्यावर सचिन वाझे ही माहिती देऊ शकतात”, असेही ईडीने म्हटले आहे.
यापूर्वी सीबीआयकडूनही वाझे यांना माफीचा साक्षीदार होण्यास परवानी देण्यात आली होती. ”सत्य उलगडण्यास आणि गुन्ह्यात इतर आरोपींची भूमिका आणि सहभाग स्पष्ट करणास आरोपी सचिन वाझे तयार असेल, तर त्यांना कायद्याप्रमाणे माफीचा साक्षीदार करण्यास सीबीआयला काहीही हरकत नाही”, असे सीबीआयकडून स्पष्ट करण्यात आले होते.
नेमकं काय आहे प्रकरण?
सचिन वाझे हा अनिल देशमुखांच्या कथीत वसुली प्रकरणातील आरोपी आहे. राज्याचे तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मुंबईतील बार आणि रेस्टॉरंटमधून १०० कोटी वसूली करण्याचे आदेश दिल्याचा दावा सचिन वाझे याने केला होता. त्यानंतर अनिल देशमुख यांना अटक करण्यात आली होती.