कराड : शहर परिसरासह लगतच्या विद्यानगर- सैदापूरमध्ये बोगस ॲकॅडमींकडून विद्यार्थी व पालकांना वेगवेगळी आमिषे दाखवून प्रवेशासाठी भुरळ पाडून अमाप माया गोळा केली जात आहे. वैध परवाना नसतानाही अनेक वर्षे सुरु असलेल्या या लुटीची चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्याकडे प्रहार जनशक्ती पक्षातर्फे निवेदनाने करण्यात आली. या वेळी निवेदनकर्त्यांच्या मागणीनुसार चौकशीचे आदेश शिक्षणमंत्री केसरकरांनी दिले असल्याची माहिती ‘प्रहार जनशक्ती’चे नेते मनोज माळी यांनी दिली.
चौकशीच्या लेखी सूचना
दरम्यान, या प्रकरणाच्या चौकशीच्या लेखी सूचना गटशिक्षणाधिकारी बिपिन मोरे यांनी दिल्या आहेत.
विद्यार्थी व पालकांमध्येही खळबळ
मनोज माळी यांच्या नेतृत्वाखालील ‘प्रहार जनशक्ती’च्या शिष्टमंडळाने शिक्षणमंत्री केसरकर यांची समक्ष भेट घेवून या गैरप्रकारावर चर्चा केली. त्या वेळी केसरकर यांनी हे प्रकरण गांभीर्याने घेवून तत्काळ चौकशीचे आदेश दिल्याने शिक्षण क्षेत्रासह विद्यार्थी व पालकांमध्येही खळबळ उडाली आहे.
आणखी वाचा-सोलापूर : वीजपुरवठा पूर्ववत होण्यासाठी ८०० वीज कर्मचारी, अभियंत्यांची मेहनत
२२ संघटना आक्रमक
कराडचे उपनगर असलेल्या विद्यानगर- सैदापूर परिसरात बेकायदा म्हणून आरोप असलेल्या ॲकॅडमींविरोधात विविध २२ संघटना आक्रमक झाल्या आहेत. या संघटनांनी स्वतंत्रपणे आपली निवेदने शिक्षणमंत्री तसेच प्रशासनाला दिली आहेत.
बेसुमार शुल्क घेऊन फसवणूक
संघटनांच्या निवेदनात म्हटले आहे की, कराड शहराला शैक्षणिक क्षेत्राची मोठी परंपरा आहे. आज विद्यानगरमध्ये हजारो विद्यार्थी विविध महाविद्यालयातून शिक्षण घेत आहेत. राज्याच्या कोनाकोपरातूनही विद्यार्थी येत असतात. मात्र, शैक्षणिक परंपरेला काळीमा फासण्याचा उद्योग बेकायदा सुरू असलेल्या ॲकॅडमी चालकांकडून होत आहे. पालकांकडून बेसुमार शुल्क घेऊन मोठी फसवणूक सुरु असल्याचे उघड झाले आहे.
आणखी वाचा-Pune Car Accident Case : विरोधी पक्ष माध्यमांना घेऊन स्टंट बाजी करत आहेत – शंभुराज देसाई
प्रशासनाला संघटनांची स्वतंत्र निवेदने
कराड-विद्यानगर परिसरात सुमारे ८० ॲकॅडमी असून, यातील अनेक ॲकॅडमी चालकांकडे कोणताही अधिकृत परवाना नाही अथवा शिक्षण विभागाचे त्यांच्यावर कोणतेही नियंत्रण नाही. यामुळे मोठी फसवणूक होत आहे. या विरोधात प्रहार जनशक्तीसह रयत क्रांती, शेतकरी संघटना, बळीराजा, स्वाभिमानी शेतकरी संघटना, जिल्हा सैनिक फेडरेशन, पालवी महिला मंच, शैक्षणिक क्रांती संघटना, क्रीडा प्रशिक्षक संघ अशा २२ संघटनांनी एकत्र येऊन बोगस ॲकॅडमींवर कारवाई करण्याबाबत प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे, गटशिक्षणाधिकारी बिपिन मोरे यांना निवेदन दिले आहे. यावर, गटशिक्षणाधिकारी मोरे यांनी लगेचच या प्रकरणाच्या चौकशीच्या लेखी सूचना दिल्या आहेत.