राज्यात सध्या दहावी आणि बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा सुरु आहेत. करोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून ऑनलाइन पद्धतीने सुरु असलेल्या परीक्षा यावेळी ऑफलाइन होत आहेत. परीक्षा ऑनलाइन व्हाव्यात यासाठी विद्यार्थ्यांनी आंदोलनदेखील केलं होतं. दरम्यान परीक्षा सुरु असताना राज्यात काही ठिकाणी गैरप्रकार होत असल्याचे प्रकार घडत आहेत. करोनामुळे सध्या शाळा तिथे केंद्र सुरु केलं असताना कॉपीचे प्रकार आढळून येत आहेत. यामुळे शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी मोठी घोषणा केली आहे.
परीक्षेदरम्यान पेपरफुटीची प्रकरणं आढळल्यास त्या शाळांची मान्यता काढून घेतली जाणार आहे. तसंच कॉपीचे प्रकार आढळले तर यापुढे त्या शाळांना परीक्षा केंद्र दिलं जाणार नाही अशी माहिती वर्षा गायकवाड यांनी विधान परिषदेत बोलताना दिली आहे. अहमदनर आणि औरंगाबादमध्ये पेपरफुटीचं प्रकरण आढळून आलेल्या शाळांची मान्यता काढून घेण्यात आल्याची माहिती वर्षा गायकवाड यांनी यावेळी दिली.
वर्षा गायकवाड यांनी काय म्हटलं?
“१५ मार्चला दहावीच्या मराठीची परीक्षा होती. करोनाची स्थिती असल्याने आपण प्रत्येक शाळेला परीक्षा केंद्र केलं. ज्या शाळेत गैरप्रकार सुरु असल्याचं आढळलं त्याची मान्यता रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. यापुढे असे काही प्रकार होत असतील परीक्षे केंद्र रद्द करणं तसंच पुढे कधीही त्यांना केंद्र न देणं यासंदर्भातील निर्णय घेतला आहे,” असं वर्षा गायकवाड यांनी सांगितलं.