शिक्षणाचा अर्थ म्हणजे केवळ वाचन, लिखाण, पठण इतका मर्यादित न ठेवता विद्यार्थ्यांने आजच्या स्पर्धात्मक जगाला सामोरे जाताना स्वत:ची क्षमता स्वत:च सिद्ध करण्याची गरज निर्माण झाली आहे. स्वत:पुरते शिक्षण न घेता समूहासाठी शिक्षण घ्यावे असा सल्ला अभिनेते अतुल कुलकर्णी यांनी दिला आहे. निमित्त होते येथील एचपीटी आरवायके महाविद्यालयात सतीश राजवाडे दिग्दर्शित ‘पोपट’ या चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी आयोजित कार्यक्रमाचे. या वेळी कुलकर्णी व राजवाडे यांच्यासह अमेय वाघ, सिद्धार्थ मेनन, केतन पवार हे कलाकारही उपस्थित होते.
सर्वप्रथम उपस्थित विद्यार्थ्यांना पोपट चित्रपटातील काही भाग दाखविण्यात आला. त्यानंतर कुलकर्णी यांनी पोपट चित्रपटाची पाश्र्वभूमी स्पष्ट केली. चित्रपटाला हास्याची किनार असली तरी चित्रपटात मांडलेला गोष्टी हसण्यावारी नेऊ नका, असे आवाहनही कुलकर्णी यांनी केले. चित्रीकरण अवघ्या तीस दिवसांतच झाले. चित्रपटात काम करताना अनेक चांगले अनुभव आल्याचे ते म्हणाले. आपल्या विद्यार्थिदशेतील आठवणींना त्यांनी उजाळा दिला. विद्यार्थ्यांशी त्यांनी भारतीय शिक्षण व्यवस्थेत आमूलाग्र बदल होण्याची गरज व्यक्त केली. प्रत्येक विद्यार्थ्यांमधील गुण ओळखण्याची संधी मिळणे आज गरजेचे आहे. हेच तत्त्व मी एक नट म्हणून आत्मविश्वासाने आत्मसात करत आहे.
पदवीपेक्षा माणसाचे महत्त्व मोठे आहे हे ओळखण्याची गरज आज निर्माण झाली असल्याचे मत कुलकर्णी यांनी मांडले. दिग्दर्शक राजवाडे यांनी विलेपार्ले येथील मिठीबाई कॉलेजमध्ये शिक्षण घेत असताना अनेक एकांकिका स्पर्धेत सहभागी होऊन ‘उत्कृष्ट अभिनेता’ म्हणून पुरस्कार मिळविल्याची आठवण सांगितली. आईने माझ्या वात्रट, खोडकर स्वभावाला कंटाळून नाटक शिकण्याच्या कार्यशाळेत घातले. आजच्या यशाची बीजे त्यात रोवली गेली असे मला वाटते. मुंबई, पुण्यानंतर नाशिक हे शहर आमच्यासाठी खूप महत्त्वाचे असल्याने प्रेक्षकांनी चित्रपटगृहातच पोपट हा चित्रपट पाहावा, असे आवाहनही त्यांनी केले. अमेय वाघ, सिद्धार्थ मेनन, केतन पवार यांनी महाविद्यालयातील एकांकिकेमुळे आपण इथपर्यंत पोहोचल्याचे नमूद केले.
या वेळी वृत्तपत्र विद्या विभागाच्या प्राचार्य वृन्दा भार्गवे, प्रा. रमेश शेजवळ, प्रा. मेघा वैद्य आदी उपस्थित होते. प्रास्ताविक प्राचार्य व्ही. एन. सूर्यवंशी यांनी केले. आभार विशाल परदेशी यांनी मानले.
शिक्षण स्वत:पुरते न घेता समूहासाठी घ्यावे – अतुल कुलकर्णी
शिक्षणाचा अर्थ म्हणजे केवळ वाचन, लिखाण, पठण इतका मर्यादित न ठेवता विद्यार्थ्यांने आजच्या स्पर्धात्मक जगाला सामोरे जाताना स्वत:ची क्षमता स्वत:च सिद्ध करण्याची गरज निर्माण झाली आहे.
First published on: 21-08-2013 at 03:32 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Education should not be take for self but for the group atul kulkarni