विधान परिषदेत आज (२८ जुलै) आमदार प्रसाद लाड यांनी पाँइट ऑफ इन्फर्मेशनच्या माध्यमातून एका गंभीर विषयावर वाचा फोडली आहे. अहमदनगर येथे अल्पवयीन मुलींचं धर्मांतर करण्याचा प्रयत्न झाला असल्याचे वृत्त प्रसाद लाड यांनी सभागृहात सांगितले. याविषयी विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी सरकारला चौकशीचे निर्देश दिले आहेत.
“अहमदनगर येथे तालुका राहुरी गाव उंबरे येथे २६ जुलै रोजी धक्कादायक घटना घडली आहे. उंबरगाव गावात इयत्ता आठवीमध्ये शिकणारी एक मुलगी एका शिक्षिकेकडे घरगुती क्लाससाठी जात होती. तेथे पठाण नामक व्यक्ती मुलांना इस्लाम व कुराण याबाबत शिक्षण देत होती. तसंच, ईद, मुस्लिमांच्या सणांना शिरखुर्मा खाऊ देत होती. त्यांच्यासोबत सेल्फी काढून मुलींना ब्लॅकमेल केले जात होते. तू माझ्यासोबत पळून नाही आली तर संबंधित फोटो सोशल मीडियावर व्हायरल करेन अशी धमकी दिली जात होती. त्यातीलच एका अल्पवयीन मुलीने या प्रकाराला वाचा फोडली. तिने तिच्या पालकांना ही गोष्ट सांगितली. तिच्या पालकांनी सदर धार्मिक ठिकाणी जाऊन विचारण्याचा प्रयत्न केला असता, हिंदू मुलांवर तोडफोड केल्याचा आरोप करून हिंदू मुलांवर चुकीचे गुन्हे नोंदवण्यात आले ही वस्तुस्थिती आहे”, अशी माहिती प्रसाद लाड यांनी सभागृहात दिली.
तसंच, “हिंदूवाडी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी साई लॉन मंगलकार्यालयात पीडित मुलीला बोलावून घडलेला प्रकार जाणून घेण्याचा प्रकार केला असता पोलीस बळाचा वापर करून हिंदू मुलांना लाठीने अमानुष मारहाण करण्यात आली. याचे दृष्य साई मंगल कार्यालयातील सीसीटीव्हीत कैद झाले आहे. ही माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी तेथील हार्डडिस्क काढून घेतली आहे. नगर जिल्ह्यातील लव्ह जिहादच्या वेळी हिंदू मुले तिथे नसताना पोलिसांकडून नाहक आरोपी बनवले आले आहे. अशीच घटना २७ फेब्रुवारी रोजी रामवाडी येथील दंगलीत घडली असून त्यावेळी उपस्थित असलेल्या हिंदु मुलांना नाहक आरोपी करण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे. अशाप्रकारे हिंदू मुलींचे धर्मांतर करून, हिंदू मुलांना अडकवणं, हे प्रकरण घृणास्पद आहे. या प्रकरणात उच्च आयपीएस अधिकाऱ्यांमार्फत चौकशी केली जावी”, अशी मागणी प्रसाद लाड यांनी केली.
यावर नीलम गोऱ्हे यांनी सरकारला निर्देश दिले आहेत. नीलम गोऱ्हे म्हणाल्या की, “कोणत्या धर्माचे आरोपी आहेत यापेक्षाही अल्पवयीन मुलींची दिशाभूल करणं आणि अपहरण करणं अशा घटना महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यात होत आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य स्तरावर पोलीस महानिरीक्षक गुन्हे हे पद असतं. महिलासंदर्भातील घटना त्यांच्याकडे वर्ग होत असतात. अल्पवयीन मुलींवरच्या घटनांसाठीही अधिकारी वर्ग आहे. नगर जिल्ह्यातील या घटनेप्रकरणी राज्य स्तरावर Crime Agaisnt Women या विभागाकडे हे प्रकरण वर्ग करून चौकशी करण्याचे मी निर्देश देते. कायद्या सुव्यवस्थेचा पुढे या सभागृाहत उपस्थित झाल्यानंतर याप्रकरणी सविस्तर निवेदन देण्याच्या सूचना मी गृहमंत्र्यांना देत आहे.”