मोदी यांच्या डोक्यावर काही परिणाम झाला असून कुठेतरी रुग्णालय पाहून त्यांची काळजी घेऊ. मोदी यांच्या सहकाऱ्यांनी काळजी करण्याचे कारण नाही, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली. निवडणुकीच्या आधीच जाहीर झालेली पंतप्रधानपदाची उमेदवारी आणि काँग्रेसमुक्त भारताची घोषणा यावरूनही त्यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला. जालना जिल्ह्य़ातील घनसावंगी येथील जाहीर सभेत ते बोलत होते.
राष्ट्रवादीचे परभणी लोकसभा मतदारसंघातील उमेदवार विजय भांबळे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत पवार म्हणाले की, नेहरू त्याचप्रमाणे इंदिरा गांधी, विश्वनाथ प्रतापसिंग, चंद्रशेखर, नरसिंह राव, अटल बिहारी वाजपेयी इत्यादी अनेक पंतप्रधान मी पाहिले. परंतु त्यापैकी कुणीही निवडणुकीच्या आधीच आपण पंतप्रधानपदाचे उमेदवार असल्याचे म्हटले नव्हते. ग्रामपंचायत निवडणुकीच्या आधीच एखाद्याने आपण सरपंच आहोत, असे म्हटले तर त्याचे डोके जागेवर दिसत नाही, असे म्हटले जाते. जात, धर्म आणि भाषेचा भेदभाव न करता जनतेच्या हिताचा विचार करणे, हे नेत्याचे काम असते. गुजरात राज्याचे मंत्रालय असलेल्या गांधीनगरपासून २० किलोमीटर अंतरावर मोदी यांच्या राजवटीत एका मुस्लिम खासदारासह २० जणांना जिवंत जाळले गेले. परंतु मोदी त्या पीडितांचे अश्रू पुसण्यासाठी गेले नाहीत. मुंबईतील बॉम्बस्फोटाच्या वेळी रात्री अडीच वाजता मी रुग्णालयात पोहोचलो होतो. त्या वेळी मृतांचे नातेवाईक माझ्यावर रागावले आणि माझ्या विरोधात घोषणा दिल्या. परंतु त्यांचा संताप परिस्थितीजन्य होता. न घाबरता मी त्यांची चौकशी केली. नेतृत्वाने अशा परिस्थितीत शिव्याशाप खाण्याची वेळ आली तरी मदतीस जावे लागते. मोदी यांच्यासारख्यांकडे देशाची सूत्रे कशी द्यायची, असा सवाल करून पवार म्हणाले की, हिंदू, मुस्लिम, शीख, ख्रिश्चन इत्यादींना ते न्याय कसा देतील?
इंग्रजांची देशावरील सत्ता घालविण्यासाठी दीडशे वर्षे स्वातंत्र्याची लढाई चालली. अनेकांनी हौतात्म्य पत्कारले. स्वातंत्र्याची ही लढाई गांधी-नेहरू यांच्या काँग्रेसच्या विचारांची होती. स्वातंत्र्यानंतर विविध क्षेत्रांमध्ये देशाची प्रगती होऊन चेहरा बदलला. त्यामागे काँग्रेसही आहे. देश काँग्रेसमुक्त करायचा तो काय मोदी यांच्यासाठी, असा प्रश्न उपस्थित करून पवार म्हणाले की, भाजपमधील पूर्वीचा कोणी मायेचा पूत देशाच्या स्वातंत्र्यासाठी तुरुंगात गेला होता का? देशाच्या गुलामगिरीविरुद्ध त्यांनी दोन पावले तरी टाकली होती का, असा सवालही पवार यांनी केला.
उमेदवार विजय भांबळे, मंत्री राजेश टोपे, राज्यमंत्री फौजिया खान, आमदार सुरेश जेथलिया, खासदार गणेश दुधगावकर, जिल्हा काँग्रेस अध्यक्ष भीमराव डोंगरे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष डॉ. निसार देशमुख यांची भाषणे या वेळी झाली. राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस अरविंद चव्हाण, बाबासाहेब गोपले, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अंकुशराव टोपे आदींची उपस्थिती या वेळी होती.

Story img Loader