हर्षद कशाळकर

अलिबाग: गेल्या महिन्याभरापासून कोकण किनारपट्टीवर अंमली पदार्थ वाहून येण्याचे सत्र सुरू होते. याचे दुष्परीणाम दिसून येण्यास आता सुरुवात झाली आहे. मुरूड येथे वाहून आलेल्या चरसचे सेवन करतांना एका तरूण तरूणीला पोलिसांनी अटक केली आहे. दोघांनाही न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. पण ही घटना पुढील धोक्याची चाहूल आहे. त्यामुळे या प्रकरणाला गांभीर्याने घेऊन, असे प्रकार टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनाकरणे गरजेचे आहे.

रायगड जिल्ह्यात गेल्या महिन्याभरात २१९ किलो वजनाची १८५ चरसची पाकिटे जिल्ह्यातील विवीध समुद्र किनाऱ्यांवर वाहून आली होती. ज्याची बाजारातील किंमत साडे आठ कोटींहून अधिक आहे. या प्रकरणी श्रीवर्धन आणि अलिबाग पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असला तरी, ही पाकिटं कुठून आणि कशी आली, कोणी टाकली, हे अद्यापही स्पष्ट होऊ शकलेल नाही. या घटनांचे दुष्परीणाम दिसून येण्यास आता सुरूवात झाली आहे. मुरूड येथे एका तरूण व तरूणीला चरसचे सेवन करताना पोलीसांनी अटक केली आहे. त्यांच्यावर एनडीपीएस अर्थात अंमली पदार्थ विरोधी कायद्या आंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघांना अलिबाग येथील विशेष सत्र न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने दोघांनाही पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. पोलीस निरीक्षक निशा जाधव यांच्या नेतृत्वाखाली या गुन्ह्याचा पुढील तपास सुरू आहे.

आणखी वाचा- “पोलीस नातवांना सांगतात, तुमची जिंदगी बरबाद”, ललित पाटीलच्या वडिलांचा आरोप; म्हणाले, “आई-बापाने…”

मुरुड शहरात रात्रीच्यावेळी पेट्रोलिंग करत असताना, शहरातील जुनी पेठ येथील खाजणात तरूण तरूणी अंमली पदार्थांचे सेवन करत बसले असल्याची खबर पोलीसांना मिळाली होती. याची माहिती पोलिसांना मिळताच पोलीस उपनिरीक्षक अविनाश ढाकरे, पोलिस नाईक सुरेश वाघमारे, परेश म्हात्रे, पोलिस शिपाई प्रशांत लोहार घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी या दोघांना ताब्यात घेतले त्यांच्याकडे असलेले चरसही जप्त केले.

पण मुरुडची ही घटना पुढील धोक्याची चाहूल आहे. या घटनेला गांभिर्याने घेणे आवश्यक आहे. गेल्या काही दिवसांपासून चरसची पाकीटे समुद्र किनाऱ्यांवर वाहून येत होती. पोलीसांनी सापडली तेवढी पाकीटे जप्तही केली. पण जी पाकीटे राहून गेली, त्यांचा वापर व्यसांनासाठी सुरु झाल्याचे दिसून येत आहे. उत्सुकतेपोटी तरूण पिढी व्यसनांच्या आहारी जाण्यास सुरुवात झाल्याचे यावरून सिध्द झाले आहे. त्यामुळे असे प्रकार टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर भर देणे आवश्यक आहे. यासाठी पोलीसांनीच पुढाकार घेऊन जनजागृती करणे आवश्यक आहे.

आणखी वाचा- सातारा: पांडे गावचे काळभैरनाथाचे उभ्याचे नवरात्र

पाकिस्तान प्रिमियम क्वालिटी राईस असा उल्लेख असलेली आणि त्यात चरस हा अंमली पदार्थ असलेली ही पाकीटे किनार पट्टीवर कशी आली याचा शोध अद्यापही लागलेला नाही. अफगाणिस्तान मधून पाकिस्तान मार्गे हे अंमली पदार्थ आले असल्याची शक्यता नाकारता येत नाही. सुरक्षा यंत्रणांच्या भितीने अथवा जाणिवपूर्वक मुंबई लगतच्या किनाऱ्यांवर ही पाकीटं समुद्रात टाकली गेली असण्याची शक्यता नाकारता येणार नाही. मुंबई लगतच्या परिसरात तरूण पिढीला व्यसनाधीन करण्याचा उद्देश यामागे असू शकतो. त्यामुळे याकडे दुर्लक्ष करणे युवा पिढीसाठी घातक ठरू शकते.

अंमली पदार्थांचे सेवन आरोग्यासाठी घातक आहेच पण अंमली पदार्थ बाळगणे हा गुन्हा आहे. त्यामुळे तरुण पिढीने याची नोंद घ्यावी. मुरूड परिसरात तरुण -तरुणी कुठे अंमली पदार्थांचे सेवन करत असतील, तर नागरिकांनी ताबडतोब पोलिसांना संपर्क करावा. कारवाई केली जाईल. -निशा जाधव, पोलीस निरीक्षक, मुरूड

Story img Loader