लोकसत्ता प्रतिनिधी
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह जोरदार अवकाळी पाऊस कोसळल्यामुळे त्याचा फटका वीज यंत्रणेलाही बसला असून, २६ वीज उपकेंद्रांशी निगडीत १२८० विजेचे खांब कोसळले आहेत. त्यातील १८ वीज उपकेंद्रांचा वीज पुरवठा महावितरणच्या वीज कर्मचारी, अभियंते व ठेकेदारांनी मिळून पूर्ववत केला आहे. अद्याप ८ उपकेंद्रे बंद असून, ती सुरु करण्यासाठी वीज यंत्रणा युद्धपातळीवर प्रयत्न करीत आहे.
जिल्ह्यात आठवडाभरापासून वादळ वाऱ्यासह पाऊस थैमान घालत आहे. मोठ-मोठे वृक्ष वीज वाहिन्यांवर उन्मळून पडल्याने वीज यंत्रणा कोलमडत आहे. त्यात २६ मे रोजी आलेल्या वादळी पावसाने अक्षरश: महापारेषणचे वीज मनोरेही कवेत घेतले. महावितरणची २६ उपकेंद्रे बंद पडली. २०५३ रोहित्रांनांना त्याचा फटका बसला. तर अनेक ठिकाणी रोहित्रेही जमीनदोस्त झाली आहेत.
आणखी वाचा-सोलापुरात रोहिणीचा पहिलाच २५ मिमी पाऊस; वादळाने वृक्ष कोसळले; फळबागांसह घरांचेही नुकसान
महावितरणच्या बारामती परिमंडलाचे मुख्य अभियंता सुनिल पावडे, प्रभारी अधीक्षक अभियंता धर्मराज पेठकर, कार्यकारी अभियंता (प्रशासन) संजयकुमार शिंदे व संबंधित विभागांच्या कार्यकारी अभियंत्यांच्या मार्गदर्शनाखाली विस्कळीत वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरणचे ३५० व ठेकेदारांकडील ४०० कर्मचा-यांची पथके तयार केली आहेत. त्यांना लागणारे विजेचे खांब, रोहित्रे, तारा व इतर साहित्य मुबलक प्रमाणात दिले आहे. दुरुस्तीची मोहीम दिवसरात्र सुरु आहे.
अद्यापि तांदुळवाडी, रे नगर, देवडी, अचकदानी, कटफळ, जामगांव, रातनजण व वैराग अशी आठ उपकेंद्रे सुरु होणे बाकी आहे. तर कामती उपकेंद्रांतील ५ एमव्हीए क्षमतेचे उच्चदाब रोहित्र नादुरुस्त झाले आहे. त्यास बदलण्याचेही प्रयत्न सुरु आहेत. सोलापूर ग्रामीण, पंढरपूर व बार्शी या तीन विभागांना कालच्या वादळाचा सर्वाधिक फटका बसला आहे. जिल्ह्यात अंदाजे ३३ केव्ही वाहिनीचे ३०, ११ केव्ही वाहिनीचे ४५० व लघुदाब वाहिनीचे ८०० खांब पडले आहेत. गावठाण, पाणीपुरवठा, रुग्णालये व औद्योगिक वाहिन्यांना सुरु करण्यास सर्वाधिक प्राधान्य दिले जात आहे.