सांगली : राग आला की एक तर मारायला हात शिवशिवतात, नाही तर तोंडातून सात पिढ्यांचा उद्धार हमखास. पण यामागे मनातील रागाला वाट करून देण्याचा मार्ग मानला जात असला तरी यात प्रामुख्याने महिलांवरूनच उद्धाक केला जातो. या पिढीजात परंपरेचा त्याग करण्याचा निर्धार सांगलीच्या नमराह फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी केला असून याची आठवण करून देण्यासाठी सह्याद्रीनगरात शिवीमुक्त कट्टाही उभारला आहे.
या परिसरात कष्टाची कामे करून आपला उदरनिर्वाह करणारा मजूर वर्ग मोठ्या प्रमाणात वास्तव्यास आहे. खिशाने गरीब असलेल्या या भागातील कार्यकर्त्यांनी नमराह फाउंडेशनच्या माध्यमातून समाजसेवेचा वसा घेतला आहे. महापूर असो व करोनाची महामारी असो अशा बिकट प्रसंगी मंडळाचे कार्यकर्ते धावून तर गेलेच, पण एकल कुटुंब, वृद्ध यांच्या रोजच्या जेवणाची व्यवस्थाही मंडळाचे कार्यकर्ते घरचेच समजून आजही करीत आहेत. मात्र, अलिकडच्या काळात केवळ भांडणातच नव्हे तर सहज संवाद साधत असताना शिवीचा प्रकार बोकाळला आहे. शिवी देणारा आणि खाणार्यालाही या शिवीचे काहीच वाटेनासे झाले आहे. मात्र, या अपशब्दामधून बदनामी होणारी महिला कोणाची तरी आई, बहीण, पत्नी, अशा नात्यातीलच असते. यामुळे शिवीच्या माध्यमातून होणारा महिलांचा अवमान रोखण्यासाठी मंडळाने शिवीमुक्त कट्ट्याची कल्पना पुढे आणली असून याचे उद्धाटन स्वातंत्र्यदिनी करण्यात आले.
हेही वाचा – अमोल कोल्हेंच्या शिरूर मतदार संघावर ठाकरे गटाचा दावा? आमदार सचिन अहिर म्हणाले, “आमच्या…”
सुखदु:खाच्या गोष्टी करण्यासाठी एकत्र जमण्यासाठीचा कट्टाच आता शिवीमुक्त करण्यात आला आहे. तसा फलकच या ठिकाणी लावण्यात आला आहे.