लोकसत्ता प्रतिनिधी
सातारा : साताऱ्यात महामार्गाचे जाळे आहे. पाणी, वीजेची सोय आहे. या पार्श्वभूमीवर येथे ‘आयटी पार्क’सह उद्योगवाढीसाठी प्रयत्नशील असल्याचे आश्वासन उद्योग मंत्री उदय सामंत यांनी येथे बोलताना दिले.
मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ सातारा (मास) यांच्या आणि एमआयडीसीच्या वतीने संवाद मेळाव्यात सामंत यांनी उद्योजकांशी संवाद साधला. यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, उद्योजक फारोख कूपर, एमआयडीसीचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजी पाटील, मुख्य अभियंता नितीन वनखंडे, विभागीय अधिकारी डॉ. अमितकुमार सोडगे, कार्यकारी अभियंता लिराप्पा नाईक, उप अभियंता लहु कसबे, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थाक उमेश दंडगव्हाळ, मासचे अध्यक्ष मानस मोहिते, धैर्यशील भोसले, बाळासाहेब खरात यांच्यासह उद्योजक उपस्थित होते.
सातारा येथे एमआयडीसीचे प्रादेशिक कार्यालय व्हावे, असे आदेश तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले होते. त्यानुसार सातारा येथे कार्यालयाचे उद्घाटन होत आहे, असे सांगून उद्योगमंत्री श्री. सामंत म्हणाले, की म्हसवड येथील नव्याने होत असलेल्या तीन हजार एकर वरील औद्योगिक वसाहतीमध्ये मोठे मोठे उद्योग येणार आहेत. यामध्ये डीफेन्स, फार्मा पार्क संबंधीत प्रोजेक्ट उभारण्याचे प्रयत्न केले जातील. फिल्म इंड्रस्टीलाही उद्योगाचा दर्जा देण्यात येणार असून, त्यातून चांगली रोजगार निर्मिती होईल.
साताऱ्याला पर्यटन विकासाला मोठी संधी आहे, त्या दृष्टीने उद्योग उभारणीसाठी प्रयत्न व्हावेत. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेमध्ये सातारा जिल्ह्याने राज्यात प्रथम क्रमांक मिळविल्याबद्दल त्यांनी जिल्ह्याचे विशेष अभिनंदन केले. राज्यात गेल्या तीन वर्षांत साडेबत्तीस हजारांहून अधिक उद्योजक निर्माण करण्यात आले आहेत. या वर्षात २३ हजार नवउद्योजक नव्याने निर्माण केले जात आहेत. या माध्यमातून साधारणत: लाखाहून अधिक लोकांना रोजगार देण्यात आला आहे.
कूपर उद्योग समूहाचे सीएमडी फारोख कूपर यांच्या दातृत्वाबद्दल त्यांचे आभार माणून साताऱ्यातील उद्योजकांचा समस्यांचा निपटारा केला जाईल. उद्योग वाढीला चालणा देण्यासाठी आवश्यक ते प्रयत्न करण्यात येईल, अशी ग्वाहीही सामंत यांनी दिली.
दळणवळण, वाहतूक, वीज, पाणी यासाठी सातारा उद्योगवाढीसाठी पूरक आहे. जिल्ह्यातील बागायती जमीन वगळून डोंगराकडची जमीन घेऊन एमआयडीसी वाढवावी. जिल्हाधिकाऱ्यांच्या अधिकारामध्ये उपलब्ध असणारी जमीन यासाठी मिळविण्यात यावी व त्या ठिकाणी आयटी पार्क उभा करावा, अशी मागणी शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केली. एमआयडीसीचे प्रादेशिक कार्यालय पूर्ण झाल्याबद्दल त्यांनी आभार मानले.
या बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक समीर शेख, उपमुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजी पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संतोष रोकडे, पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता अरुण नाईक, जयंत शिंदे, प्रांताधिकारी राहुल बारकुल, उज्ज्वला गाडे, जिल्हा नियोजन अधिकारी शशिकांत माळी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते