सांगली : विकेंद्रित यंत्रमागाच्या प्रश्नाबाबत केंद्रीय वस्त्रोद्योग विभागाला वास्तवदर्शी अहवाल सादर करून समस्यांचे निराकरण करण्याचा प्रयत्न करण्याचे आश्वासन संचालक सतीशकुमार सिंग यांनी गुरुवारी विटा येथे दिले.

केंद्रीय वस्त्रोद्योग आयुक्त कार्यालयाचे संचालक सतीशकुमार सिंग यांनी आज विटा यंत्रमाग संघास भेट दिली. या वेळी तांत्रिक अधिकारी योगेश पवार, सहायक राजीव नायर हे त्यांच्यासोबत होते. विटा यंत्रमाग सहकारी संस्थेचे अध्यक्ष किरण तारळेकर यांनी स्वागत केले. या व्यवसायातील अडचणी, समस्या यंत्रमाग धारकाकडून जाणून घेतल्या. यानंतर याबाबत आपण सकारात्मक असल्याचे सांगत प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहू असे सांगितले.

जागतिकीकरणानंतर जगभरातील वस्त्र उत्पादकांशी स्पर्धा निर्माण झाली असून वस्त्रोद्योगातील प्रमुख कच्चा माल असलेल्या कापसाचे दर जगातील बाजारातील दराशी निगडित असतील तरच त्यावरची सूत, कापड, गारमेंट ही उत्पादने जागतिक स्पर्धेमध्ये विक्री किमतीच्या स्पर्धेत टिकू शकतील. परंतु सद्य:स्थितीत आपल्याकडील कापसाचे दर बहुतेक वेळा जागतिक दराच्या तुलनेत महाग राहत असल्याने त्यावर उत्पादित साखळीची उत्पादनेही महाग होत असल्याने निर्यात प्रभावीत होते. देशांतर्गत बाजारपेठेत या उत्पादनांचा मागणीपेक्षा अतिरिक्त पुरवठा उपलब्ध झाल्याने स्पर्धा निर्माण होऊन दर कमी होतात व परिणामी नुकसान होत आहे. याबाबत वास्तव समजून घेण्यासाठी देशातील विविध यंत्रमाग केंद्रातील वस्त्रोद्योग प्रतिनिधी व त्यांची समिती नेमून उपाययोजना करावी, अशी मागणी तारळेकर यांनी यावेळी केली.

या वेळी अशोकराव रोकडे, विनोद तावरे, वैभव म्हेत्रे, धनंजय शहा, राजु चौगुले, संजय तारळेकर, राम तारळेकर, सचिन गायकवाड, दिलीप वारे, महादेव कुरकुटे, राजू भागवत, डी. के. चोथे, राजधन चोथे यांच्यासह यंत्रमागधारक उपस्थित होते.

Story img Loader