सांगली : मिरजेत २५० खाटांचे कर्करोग उपचार केंद्र सुरू करण्यासाठी आपण प्रयत्नशील असून हृदयरोगावर उपचार करण्याची सुविधा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रूग्णालयात उपलब्ध करून देण्यात येईल असे प्रतिपादन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी रविवारी केले.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय मिरज येथे मॉड्युलर आय.सी.यू. आणि मॉड्युलर ऑपरेशन थेएटर चे लोकार्पण वैद्यकीय शिक्षण मंत्री मुश्रीफ यांच्या हस्ते झाले. त्या प्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी खासदार विशाल पाटील, आमदार इद्रिस नायकवडी, आमदार डॉ. सुरेश खाडे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरजचे अधिष्ठाता डॉ. प्रकाश गुरव, वैद्यकीय अधिक्षक डॉ. प्रियांका राठी, उपवैद्यकीय अधिक्षक डॉ. रुपेश शिंदे, जिल्हा नियोजन अधिकारी अशोक पाटील यांच्यासह महापालिकेचे माजी पदाधिकारी, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिकारी, विद्यार्थी उपस्थित होते.
मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, या नविन सुविधेचा गोरगरीब व सामान्य जनतेला लाभ व्हावा. या रूग्णालयामध्ये विद्यार्थी, विद्यार्थीनींच्या वसतिगृह दुरूस्तीसाठी १७ कोटी रूपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आल्याचे सांगून याचे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण होईल, असे ते म्हणाले. या रूग्णालयामध्ये हृदयरोग विभाग, मिरजेला कॅन्सर केअर हॉस्पीटल लवकरात लवकर सुरू करण्यासाठी, नर्सिंग कॉलेजला इमारत मंजूर होण्यासाठी, सुपरस्पेशालिटी रूग्णालय मंजूर होण्यासाठी प्रयत्न करू असे ते म्हणाले. या महाविद्यालयात प्रवेश घेणारे विद्यार्थी गुणवत्तेवर आलेले असताना त्यांना वैद्यकीय क्षेत्रातील अत्याधुनिक ज्ञान मिळणे आवश्यक असल्याने यासाठी सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्याची शासनाची जबाबदारी असल्याचेही ते म्हणाले.यावेळी खा. पाटील, आ. नायकवडी, आ. खाडे यांचेही भाषण झाले. प्रास्ताविकात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ प्रकाश गुरव यांनी रूग्णालयात पुरविण्यात आलेल्या विविध सोयी सुविधांबद्दल सविस्तर माहिती दिली. सूत्रसंचालन उपवैद्यकीय अधीक्षक डॉ. शिंदे यांनी केले.