लोकसत्ता वार्ताहर

कराड : धाराशिव, बीड, गेवराईचे प्रतिकूल हवामान, दिवसाचे तळपते ऊन, रात्रीची कडाक्याची थंडी यासह शारीरिक क्षमतेचा कस पाहणार्‍या १,२१० किलोमीटर एलआरएममध्ये सहभागी होत कराड तालुक्यातील तिघा सायकलिस्टनी यशाला गवसणी घातली.

कोणत्याही परिस्थितीत कोणाचीही मदत न घेणे बंधनकारक असलेल्या या आव्हानात्मक सायकलिंगमध्ये साभागींनी यश मिळवले. लांब पल्ल्याच्या सायकलिंगला प्रोत्साहन देणार्‍या आंतरराष्ट्रीय पातळीवरील ऑडेक्स क्लब पॅरेशियनकडून (पॅरिस) नियंत्रित ‘एलआरएम’चे चिपळूणच्या सह्याद्री रॅन्डोनिअर्सकडून आयोजन केले होते.

शनिवारी ८ फेब्रुवारीला पहाटे पाच वाजता सुरू झालेल्या बाराशे किलोमीटर एलआरएममध्ये आटके (ता. कराड) येथील पत्रकार चंद्रजीत पाटील, उंब्रजचे संतोष बाबर व सचिन निकम, इचलकरंजीचे कृष्णत गोंदुकुप्पे, मुंबईचे सचिन पालकर, चिपळूणचे प्रशांत दाभोळकर, युवा सायकलिस्ट राघव यांच्यासह चिपळूणच्या नेत्रतज्ज्ञ मनिषा वाघमारे यांनी यश मिळवले. डॉ. वाघमारे या कोकण विभागातील एलआरएममध्ये यश मिळविणार्‍या पहिल्या महिला सायकलिस्ट बनल्या. तर चंद्रजीत पाटील, संतोष बाबर आणि सचिन निकम हे तिघे सातारा जिल्ह्यातील पहिलेच सायकलिस्ट आहेत.

पाटणहून तारळे घाटपायथा, पुन्हा पाटण- कराड- सातारा- केळघर घाट पायथा- पुन्हा सातारा- शिरवळ- लोणंद- फलटण- पंढरपूर- मोहोळ- सोलापूर- तुळजापूर- धाराशिव- ते गेवराई आणि तेथून लोणंदपर्यंत त्याच मार्गाने सायकलिंग करत वाढे फाटा मार्गाहून सातारा ते कराड आणि तेथून पाटण असा या एलआरएमचा १२०० किलोमीटरचा मार्ग होता.

सातार्‍यातून मेढा मार्गाने केळघर (महाबळेश्वर मार्ग) घाट पायथ्यापर्यंतची चढाई, त्यानंतर लोणंद ते वेळापूर आणि तेथून मोहोळपर्यंत रात्रीचा प्रवास, त्यानंतर दुसर्‍या दिवशी सोलापूरपासून बीडपर्यंत, तिसर्‍या दिवशी बीड ते सोलापूर, चौथ्या दिवशी नातेपुते ते काशिळपर्यंत दिवसभर शारीरिक क्षमतेची परिक्षा पाहणार्‍या कडक उन्हात सहभागी सायकलिस्टंना दररोज सुमारे दोनशे किलोमीटर सायकलिंग करावे लागले. याशिवाय पहाटे व रात्री ११ ते १२ वाजेपर्यंत थंडीवर मात करत १०० ते १२५ किलोमीटर अंतर पार करावे लागत होते. हे आव्हान सहजगत्या पेलत आठ सायकलिस्टनी विजयी पताका फडकावली.

Story img Loader