नागपूर येथील लग्न समारंभ आटोपून वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथे परतणाऱ्या वऱ्हाडाच्या खासगी बसला आग लागल्याने आठ जण जागीच मृत्युमुखी पडले, तर नवरदेवाच्या वडिलांसह पाच जखमी झाले. शनिवारी पहाटे २.५५च्या सुमारास नागपूर-जामदरम्यानच्या हॉटेल संतरामजवळच्या खंडाळा शिवारात ही घटना घडली. यात खासगी बसचा पेटून पूर्णत: कोळसा झाला.
हिंगणघाटच्या अब्दुल्लानगरात राहणारे रेल्वेचे निवृत्त लिपिक संजय राजाराम कुमार यांच्या मुलाचे नागपूर येथे कामठी रोडवर पॉवर ग्रिड कॉलनीत सप्तरंग हॉलमध्ये काल सायंकाळी ६.३० वाजता लग्न होते. समारंभ आटोपून रात्री १ वाजता नागपूरहून हिंगणघाटकडे परतताना जामजवळ शेडगाव टोलनाक्यावर सुमारे ५० वऱ्हाडी घेऊन येणारी बस अचानक बंद पडली. चालक शेख मोहसीन शेख कासम (२३) याने तपासणी करून ते व्यवस्थित केले व पुढच्या प्रवासासाठी निघाले. बस एक कि.मी. अंतर जात नाही तोच वाहनाला अचानक आग लागली. आग इतक्या झपाटय़ाने पसरली की, त्यात आठ जणांचा अक्षरश: कोळसा झाला. मृतांमध्ये देवानंद भगत (३५, हिंगणघाट), चंद्रप्रभा हरिदास मेश्राम (रा. तारसा, ता. मौदा, जिल्हा-नागपूर), नानूबाई नत्थू भगत (७०, रा. वायगाव (हळद्या), ता. समुद्रपूर), सुमित्रा जगदीश नगराळे (४०, रा. पिंपळगाव (लुटे), ता. देवळी), आदित्य ऊर्फ चेतन अजय मानकर (८, रा. वायगाव (हळद्या), प्रतीक भानुदास डोफे (१४, रा. ब्राह्मणी), ज्ञानेश्वर घनश्याम हुमने (४८, रा. चामट, ता. मौदा) व चंद्रभागा म्हैसकर (६५, रा. सावंगी (वडगाव), ता. समुद्रपूर) यांचा समावेश आहे. मृतांत नवरदेवाची बहीण, भाचा व मावशीचा समावेश असून नवरदेवाचे वडील संजय राजाराम कुमार यांना जखमी अवस्थेत सेवाग्राम येथे दाखल करण्यात आले आहे. इतर जखमींमध्ये धारा प्रमोद कुत्तरमारे, स्नेहा फुलकर, प्रमोद रामचंद्र कुत्तरमारे व प्रतीक कुत्तरमारे यांचा समावेश आहे. अपघातानंतर जाम महामार्ग पोलीस उपनिरीक्षक प्रमोद पाटील, नरेश जाधव, समुद्रपूरचे ठाणेदार राजकमल वाघमारे व उपविभागीय पोलीस अधिकारी प्रकाश देशमुख यांनी घटनास्थळ गाठून परिस्थितीवर ताबा मिळविला. आमदार अशोक शिंदे व हिंगणघाटचे नगराध्यक्ष सुरेश मुंजेवार यांनीही घटनास्थळाला भेट दिली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा