सावंतवाडी, आंबोली, कुडाळ-वाडोस भागात सध्या आठ हत्तींचा कळप आहे. काल एकाच दिवशी हत्तींनी दोघांना जखमी केले आहे. या हत्तीच्या दहशतीमुळे शेतकरी वर्गात प्रचंड नाराजी आहे. गेल्या काही वर्षांत हत्तींनी पाच जणांना ठार, तर पंधरा जणांना जखमी केले आहे. आंबोली नागरतास येथील चंद्रकांत गावडे यांना हत्तींनी जखमी केल्याने ते गोवा येथे तर माणगाव गोठोस मांजरझरावाडी येथील संतोष सीताराम पालव (२०) हा जखमी झाल्याने त्याला येथील डॉ. रेवण खटावकर यांच्या दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे. दोघांची प्रकृती सुधारत आहे. हत्तींनी रात्रीच्या वेळी शेतकऱ्यावर घरानजीक हल्ला केला. आंबोलीत पाच, तर माणगाव बाडोसमध्ये तीन हत्तींचा कळप आहे. या आठ हत्तींनी सिंधुदुर्गात मुक्काम केला असून, त्यांचा मुक्काम वाढण्याची शक्यता आहे, असे वनविभागाचे म्हणणे आहे. वनहत्तींपासून लोक त्रस्त असले तरी या हत्तींना कर्नाटक दांडेली अभयारण्यात पाठविण्यासाठी वनखाते कोणतीही ठोस कृती करत नाही. हत्तीच्या त्रासाने शेतकरी वर्ग कंटाळला असून, माणगाव खोऱ्यात हत्तींनी तळ ठोकला आहे. कर्नाटक दांडेली अभयारण्यातून आलेल्या हत्तींनी आतापर्यंत शिरंगे येथे शंकर बाळा गावडे याला १० एप्रिल २००४, कुडाळ तालुक्यातील पावशी येथील अशोक विश्राम कुंभार ३० नोव्हेंबर २००६, निवजे येथील कृष्णा राजाराम कदम याला १२ डिसेंबर २००७, ओटवणे येथे केशव उपरकर याला १८ फेब्रुवारी २००८, तर कळणे येथे विठू जानू खरवत याला २२ मे २००८ रोजी ठार केले आहे. या पाच जणांना हत्तींनी ठार केल्यानंतर चार जणांना प्रत्येकी दोन लाखप्रमाणे आठ लाख रुपयांची भरपाई देण्यात आली. मात्र विठू खरवत यांना कायदेशीर वारस नसल्याने भरपाई देण्यात आलेली नाही, असे वनखात्याने सांगितले.
हत्तींनी १५ जणांना जखमी केले
आतापर्यंत हत्तींनी पंधरा जणांना जखमी केले. बांदा येथील चंद्रशेखर सावंत यांना ३१ जानेवारी २००६, आरोसबाग येथील सहदेव चांदेरकर यांना २ मार्च २००७, पिंगुळी येथील रवींद्र तुकाराम यांना ३१ मार्च २००७, माणगांव-भटवाडी येथील पांडुरंग कुडतरकर यांना २९ एप्रिल २००७, वायंगणी येथील हेमंत धोंड यांना ३ जुलै २००७, ओटवणे येथील बाबाजी तारी यांना १८ फेब्रुवारी २००८, शिरोडा वेळागर येथील विनायक कवठणकर यांना २० सप्टेंबर २००९, आरवली येथील सुनील कावळे यांना २० सप्टेंबर २००९, निळेली येथील विकास येडगे यांना २० डिसेंबर २००९, निवजे येथील घनश्याम लाड यांना २९ जून २०११, निवजे बेनीत डिसोजा यांना १८ नोव्हेंबर २०११, घावनळे येथील रामा घाडीगांवकर यांना २३ नोव्हेंबर २०११, तर कसाल येथील बाबुराव शिंगार्डे यांना २८ नोव्हेंबर २०१२ रोजी जखमी केले आहे. हत्तींनी जखमी केलेल्या १५ पैकी दहा जणांना प्रत्येकी ५० हजारप्रमाणे रु. चार लाख, तर हेमंत धोंड यांना एक हजार ६९ रुपये, सुनील कावळे यांना दोन हजार १६५ रुपये व रामा घाडीगांवकर यांना अर्थसाहाय्य मंजूर करण्यात आलेले नाही. जंगली हत्तींनी आतापर्यंत पाच हजार ९३३ शेतकऱ्यांचे रु. ७ कोटी १५ लाख ७६ हजार एवढे नुकसान केलेले आहे. सन २००८-०९ मध्ये रु. २ कोटी ६ लाख एवढे मोठे नुकसान केले आहे. हत्तींनी शेती, बागायतीचे नुकसान करतानाच दहशत माजविली आहे. पण त्याकडे शासन व वनखात्याने दुर्लक्ष केले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा