जालना जिल्हय़ात २००७ ते २००९ दरम्यान झालेल्या पाझर तलावाच्या कामात झालेल्या अपहाराची पाळेमुळे बरीच खोलवर गेल्याचे लाचलुचपत विभागाच्या छाप्यात शुक्रवारी उघड झाले. जालना जिल्हय़ातील दाभाडी व पापळ येथे पाझर तलावांच्या कामात अपहार केल्याप्रकरणी लघुपाटबंधारे विभागामधील ४ अधिकाऱ्यांच्या घरावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी छापे टाकले. छाप्यात तब्बल ८ किलो सोने आढळले. या प्रकरणात अडकलेल्या सेवानिवृत्त उपविभागीय अधिकारी भास्कर जाधव याच्या घरात सोन्याच्या विटा आढळल्या. त्याच्याकडून ६ किलो सोने जप्त करण्यात आले, तर अन्य अधिकाऱ्यांची कोटय़वधींची संपत्तीही छाप्यात उघडकीस आली.
या दोन कामांसाठी ४ अधिकाऱ्यांनी १४ लाख २७ हजार रुपयांची रक्कम अतिरिक्त दिली. या कामातील भ्रष्टाचाराच्या तक्रारी लाचलुचपत विभागाकडे आल्या होत्या. चौकशीअंती चौघांच्या घरावर छापे टाकण्यात आले. औरंगाबाद येथे कार्यकारी अभियंता पदावर काम करणारे रघुवीर गणपत यादव, तत्कालीन उपविभागीय अभियंता भास्कर काशिनाथ जाधव, शाखा अभियंता रामेश्वर कोरडे, भोकरदन येथील तत्कालीन मजूर संस्थेचे अध्यक्ष सुभाष देशपांडे, वडीगोद्री येथील राजेंद्र खोमणे, जाफराबाद तालुक्यातील ताडोळ येथील ढवळे यांच्याविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला.
भास्कर जाधव याच्या घराची झडती घेतली असता सोन्याच्या विटाही आढळल्या. त्याच्या घरातून ६ किलो २५५ ग्रॅम सोने आढळून आले. तत्कालीन कार्यकारी अभियंता यादव याच्या घराची तपासणी केली असता त्याच्याकडे १ किलो ७०० ग्रॅम सोने व ५१ लाख रुपयांची संपत्ती आढळून आली. श्रीनिवास काळे या शाखा अभियंत्याकडे १७ तोळे सोने व ८१ लाख रुपयांची मालमत्ता आढळून आली. कनिष्ठ अभियंता रामेश्वर कोरडे याच्याकडे ८ लाख ६४ हजार रुपयांची रोकड आढळली.
कोटय़वधी रुपयांची ही माया अधिकाऱ्यांनी कशी जमविली, याचा शोध घेतला जात आहे. ज्या दोन पाझर तलावांमधील घोटाळय़ांची चौकशी केली जात होती, ते पाझर तलाव २००७ ते २००९ या कालावधीमध्ये बांधण्यात आले. जेथे पाझर तलाव उभारला, तेथे न जाताच घरी बसूनच या अधिकाऱ्यांनी मोजमापपुस्तिका लिहिल्या. ठेकेदाराशी संगनमत करून त्यांना अधिकचे देयक अदा केले. पदाचा दुरुपयोग करीत दाभाडी येथील पाझर तलाव क्रमांक ५मध्ये ४ लाख ६१ हजार ४७८ रुपयांचे वाढीव देयक अदा करण्यात आले, तर पापळ येथील पाझर तलाव क्रमांक ८मध्ये ९ लाख ६५ हजार ५७३ रुपये ठेकेदारांना अधिक दिले गेले. या अनुषंगाने केलेल्या तपासणीनंतर जालना जिल्हय़ातील बदनापूर आणि टेंभुणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. चारही अधिकाऱ्यांना पोलिसांनी अटक केली.
शुक्रवारी सायंकाळपर्यंत झडती सुरू होती. चारही अधिकाऱ्यांच्या संपत्तीच्या मोजमापात वाढ होऊ शकते, असे लाचलुचपत अधिकाऱ्यांनी सांगितले. पोलीस अधीक्षक संजय बावीस्कर, उपअधीक्षक एच. व्ही. गिरमे, पोलीस निरीक्षक व्ही. बी. चिंचोले, एस. एम. मेहत्रे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा