शिवकाळात गनिमी काव्याचे हत्यार मिळालेले मराठी योद्धे जमिनीवरील लढाईत किती तरी पटींनी सरस असल्याचा इतिहास असताना आधुनिक काळात हेच योद्धे आता जमिनीवरील युद्धाबरोबर अवकाशातील युद्धात पारंगत होण्याच्या दिशेने झेप घेत आहेत. काही वर्षे सेवा केल्यानंतर लष्कराच्या हवाई दलात वैमानिक म्हणून एकाच वेळी दाखल झालेले आठ अधिकारी हे त्याचे उदाहरण. या निमित्ताने प्रत्येकाचे गगनभरारी घेण्याचे स्वप्न प्रत्यक्षात आले आहे.
येथील आर्मी एव्हिएशन स्कूलतर्फे शनिवारी आयोजित २०व्या दीक्षांत सोहळ्यात लष्कराच्या हवाई दलात समाविष्ट झालेल्या ३५ वैमानिकांच्या तुकडीत प्रथमच मराठी लष्करी अधिकाऱ्यांचा वरचष्मा राहिला. खरे तर भारतीय सेनेत प्रांत वा धर्म यांना कोणतेही स्थान नाही. त्यामुळे स्कूलच्या इतिहासात पहिल्यांदाच इतक्या मोठय़ा संख्येने मराठी लष्करी अधिकारी वैमानिक होण्याची घटना हा केवळ योगायोगाचा भाग असल्याची भावना अमरावतीचे कॅप्टन आशीष खेरडे यांनी व्यक्त केली. त्यांच्यासोबत विकास बांदेकर, अर्जुन सावंत व राहुल चव्हाण (मुंबई), दीपक नेटके, मयुरेश बारभाई (पुणे), शुभम कुलकर्णी (नाशिक) आणि अविनाश सोमवंशी (उस्मानाबाद) हे कॅप्टन पदावर कार्यरत अधिकारी आता वैमानिक झाले आहेत. लष्करी अधिकाऱ्यांना दोन वर्षांच्या सेवेनंतर त्यांच्या हवाई दलात जाण्याचा पर्याय उपलब्ध असतो. लष्कराचे हवाई दल आणि भारतीय हवाई दल हे दोन्ही पूर्णपणे भिन्न विभाग आहेत. म्हणजे, त्यांचा परस्परांशी तसा कोणताही थेट संबंध नाही. लष्करी हवाई दलावर युद्ध वा शांततेच्या काळात सीमावर्ती भागातील पुरवठा व्यवस्था, आकाशात हवाई कक्षाची स्थापना करून तोफखान्याच्या माऱ्याचे निरीक्षण या स्वरूपाची जबाबदारी असते. त्यासाठी हेलिकॉप्टरचा पूर्णपणे वापर केला जातो. लवकरच दाखल होणाऱ्या ‘रुद्रा’ लढाऊ हेलिकॉप्टरमुळे शत्रूवर हल्ला चढविण्याची नवीन जबाबदारी या वैमानिकांवर येणार आहे.
वैमानिक बनलेले हे मराठी अधिकारी आधी लष्कराच्या पायदळ, तोफखाना, कोअर ऑफ सिग्नल, हवाई संरक्षण या विभागात कार्यरत होते. लहानपणापासून वैमानिक बनण्याची त्यांची प्रबळ इच्छा होती. त्याकरिता काही जणांनी आधी हवाई दलात जाण्यासाठी प्रयत्नही केले. परंतु, काही कारणास्तव ते यशस्वी झाले नसल्याची प्रांजळ कबुली कॅप्टन शुभम कुलकर्णी यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना दिली. कॅप्टन दीपक नेटके वगळता इतरांना कौटुंबिक लष्करी पाश्र्वभूमी नाही.
आर्मी एव्हिएशन स्कूलची कामगिरी
भारतीय लष्करास हेलिकॉप्टर वैमानिकांची भासणारी कमतरता भरून काढण्यासाठी नाशिक येथे आर्मी एव्हिएशन स्कूलची स्थापना करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने प्रशिक्षण देणारी ही देशातील एकमेव संस्था. हवाई सरावाचा कोणताही अनुभव नसलेल्या लष्करी अधिकाऱ्यांना येथे प्रारंभी ‘बेसिक पायलट’ आणि नंतर ‘कोम्बॅक्ट एव्हिएटर्स’ प्रशिक्षण पूर्ण करावे लागते. त्या अंतर्गत जवळपास ९० तासांच्या हवाई सरावाचा अनुभव दिला जातो. गांधीनगर येथील स्कूलच्या प्रांगणात लष्कराचे प्रशिक्षण विभागाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल बी.एस. सच्चर यांच्या प्रमुख उपस्थितीत दीक्षांत सोहळा पार पडला. या वेळी प्रत्यक्ष युद्धात या दलामार्फत केल्या जाणाऱ्या कार्यवाहीची चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. त्यात चित्ता, चेतक व ध्रुव या हेलिकॉप्टर्सनी सहभाग नोंदविला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा