गडचिरोली : जिल्ह्याला लागून असलेल्या छत्तीसगडमधील नारायणपूरच्या अबुझमाड जंगलात झालेल्या पोलीस-नक्षलवादी चकमकीत आठ नक्षलवादी ठार झाले, तर एक जवान शहीद आणि २ जखमी झाले. ठार झालेल्या नक्षलवाद्यांवर एकूण ३८ लाखांचे बक्षीस होते.
छत्तीसगड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन दिवसांपासून नारायणपूर, कांकेर, दंतेवाडा आणि कोंडागाव या चार जिल्ह्यांतील जिल्हा राखीव दल, स्पेशल टास्क फोर्स आणि इंडो-तिबेट बॉर्डर पोलीस जवानांचे संयुक्त पथक अबुझमाड परिसरातील कुतुल, फरसाबेदा, कोडामेटा जंगलात नक्षलविरोधी मोहिमेवर होते. नक्षलवाद्यांनी पोलिसांच्या दिशेने गोळीबार केला. या वेळी चकमकीत आठ नक्षलवादी ठार झाले, तर एक जवान शहीद झाला. त्या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला.
हेही वाचा >>> चामुंडी कंपनी स्फोटातील बळींची संख्या आठवर, जखमी कामगाराचा मृत्यू , एकावर उपचार
वर्षभरात १३५ हून अधिक नक्षलवादी ठार
यापूर्वी ७ जून रोजी नारायणपूर-दंतेवाडा येथे नक्षलवादी आणि डीआरजी जवानांमध्ये चकमक झाली होती. ज्यामध्ये सात नक्षलवादी ठार तर तीन जवान जखमी झाले होते. छत्तीसगड सरकारच्या आकडेवारीनुसार, वर्षभरात १३६ नक्षलवादी मारले गेले व ५०३ जणांना अटक करण्यात आली. ४३७ जणांनी आत्मसमर्पण केले.