भीमा नदीपात्रात अनधिकृत वाळू उपसा सुरूच असून बुधवारी कर्जतचे तहसीलदार जयसिंग भैसडे व पुणे जिल्हयातील महसूल विभागाचे कर्मचारी अशा संयुक्त पथकाने कर्जत तालुक्यातील गणेशवाडी व पुणे जिल्ह्य़ातील वाटलूज, नायगाव परिसरात वाळूउपसा करणा-या तब्बल आठ फायबर बोटी पंपासह बुडवल्या. वाळूमाफियांची स्कॉर्पिओ मोटारही जप्त करण्यात आली आहे.
या पथकामध्ये विश्वास राठोड, नंदकुमार गव्हाणे, गणेश सोनवणे, कोतवाल सदा गावडे, मदतनीस साईनाथ थोरात, पोलीस उपनिरीक्षक गणेश जांभळे, पोलीस हवलदार अशोक धांडे व श्री बुक्तारे यांचा समावेश होता.
जिल्ह्य़ातील ही मोठी कारवाई मानली जाते. कर्जत तालुक्यातील भीमा नदीच्या पात्रामध्ये मोठया प्रमाणावर अनाधिकृत वाळूउपसा सुरू आहे. यात पुणे व नगर जिल्ह्यातील वाळूमाफिया गुंतले आहेत. वांरवार कारवाई करूनही हा उपसा बंद होत नाही. अतिउपशामुळेच या परिसरात आता वाळू शिल्लक राहिलेली नाही, तरीही खोल खणून वाळू उपसण्याचे उद्योग सुरू आहेत.
कर्जतचे तहसीलदार भैसडे हे वारंवार नदीपात्रात घुसून धाडसाने कारवाई करीत आहेत. मध्यतंरी त्यांनी मोठी कारवाई केली होती. मात्र कालांतराने पुन्हा हे उद्योग सुरू झाले आहेत.