महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेच्या २०११-१२ या पाचव्या वर्षांत गतवर्षीच्या तुलनेत सरस कामगिरीची नोंद झाली असली तरी तंटामुक्त ठरलेली उत्तर महाराष्ट्रातील २८७ पैकी केवळ आठ गावे विशेष शांतता पुरस्कार मिळवू शकली आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे, ही गावे एकटय़ा जळगावमधील असून नाशिक, धुळे व नंदुरबार जिल्ह्य़ांतील एकही गाव या विशेष पुरस्कारासाठी पात्र ठरू शकले नाही. यावरून जळगावच्या पाचोरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बहुतेक गावांनी तंटे मिटविण्यात सातत्य राखल्याचे स्पष्ट झाले आहे.
गावपातळीवरील वाद सामोपचाराने मिटविणे आणि नव्याने तंटे निर्माण होऊ नयेत म्हणून प्रतिबंधात्मक कार्यक्रम राबवून ग्रामीण भागाच्या विकासाला चालना देण्याच्या उद्देशाने राबविल्या जाणाऱ्या महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेतील २०११-१२ वर्षांतील तंटामुक्त गावांची यादी शासनाने नुकतीच जाहीर केली. त्यात उत्तर महाराष्ट्रातील २८७ गावांचा समावेश आहे. चवथ्या वर्षीच्या तुलनेत पाचव्या वर्षांत तंटामुक्त गावांची संख्या दुपटीने वाढून चांगली कामगिरी नोंदविण्यात आली. उत्तर महाराष्ट्रातील ३,२७५ गावे मोहिमेत सहभागी झाली होती. त्यातील नाशिक जिल्ह्य़ातील १३८, जळगावमधील ६६, धुळे ७२ आणि नंदुरबार जिल्ह्य़ातील ११ गावे तंटामुक्त गाव म्हणून जाहीर झाली. या गावांना लोकसंख्येनुसार पुरस्काराची रक्कम मिळणार आहे. या मोहिमेंतर्गत १९० पेक्षा अधिक गुण मिळविणाऱ्या गावांना त्यांना मिळणाऱ्या पुरस्काराशिवाय मिळालेल्या पुरस्कार रकमेच्या २५ टक्के इतकी रक्कम विशिष्ट सन्मानचिन्हासह शांतता पुरस्कार म्हणून दिली जाते. तसेच ज्या गावांनी पुढील वर्षांत तंटे मिटविण्यामध्ये सातत्य राखले त्यांना विशेष पुरस्कार दिला जातो. उत्तर महाराष्ट्रात तंटामुक्त ठरलेल्या जळगाव जिल्ह्य़ातील केवळ आठ गावांना हा पुरस्कार मिळाला आहे. नाशिक, धुळे व जळगाव जिल्ह्य़ातील एकही गाव विशेष पुरस्कार मिळवू शकले नाही.
विशेष शांतता पुरस्कार प्राप्त करणाऱ्या गावांमध्ये पाचोरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वडगांव खाकुर्डी, बांबरूड प्र. बो., भोरटेक खुर्द, सारोळा खुर्द, टाकळी बुद्रुक, दुसखेडा, तर पिंपळगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भोजे आणि पारोळा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शिरसोदे यांचा समावेश आहे. पाचोरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बहुसंख्य गावांनी महत्प्रयासाने हा निकष पूर्ण केल्याचे दिसून येते. त्यात पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचेही योगदान लाभले. या आठ गावांना त्यांना मिळणाऱ्या पुरस्काराच्या रकमेच्या २५ टक्के इतकी अधिक रक्कम विशेष शांतता पुरस्काराच्या स्वरूपात मिळणार आहे.
मोहिमेत उत्तर महाराष्ट्रात उत्कृष्ट कामगिरी नोंदविणाऱ्या नाशिकसह धुळे व नंदुरबारमधील एकाही गावाला मूल्यमापनात १९० पेक्षा अधिक गुण प्राप्त करता आले नाही. तसेच तंटे मिटविण्यात सातत्य राखले गेले नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा