“महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या नावावर केवळ राजकारण केलं गेलं आहे. महाराष्ट्रातील एक वरिष्ठ नेते (शरद पवार) केंद्र सरकारमध्ये अनेक वर्षे कृषीमंत्री होते. त्यांनी शेतकऱ्यांसाठी काय केलं? त्यांनी आपल्या सात वर्षांच्या कार्यकाळात (केंद्रीय कृषीमंत्री म्हणून) देशातील शेतकऱ्यांकडून केवळ साडेतीन लाख कोटींचा शेतमाल एमएसपीवर खरेदी केला. पण आमच्या सरकारने सात वर्षांत १३.५ लाख कोटी रुपये शेतकऱ्यांना दिले”, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिर्डीतील कार्यक्रमात केले. महत्त्वाचं म्हणजे पंतप्रधान मोदी शरद पवारांवर टीका करत असातना त्यांचे पुतणे अजित पवार त्याच व्यासपीठावर उपस्थित होते. त्यामुळे सध्या अजित पवारांना शरद पवार गटाने लक्ष्य केलं आहे. अजित पवारांनी याबाबत उत्तर द्यायला हवं, असंही शरद पवार गटाकडून म्हटलं जातंय. दरम्यान, माजी गृहमंत्री आणि शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांनीही अजित पवारांवर सडकून टीका केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी काल महाराष्ट्रात आले होते, महाराष्ट्रात आल्यानंतर त्यांनी शरद पवारांबाबत वक्तव्य केलं. शरद पवार केंद्रीय कृषीमंत्री होते तेव्हा त्यांनी शेतकऱ्यांसाठी काहीच केलं नाही, असा उल्लेख मोदींनी आपल्या भाषणात केला”, असं अनिल देशमुख म्हणाले. तसंच, त्यांनी मोदींची डिसेंबर २०११ ची एका मुलाखतीचा भागही यावेळी वाचून दाखवला. ज्यामध्ये शरद पवारांचे प्रत्येक पाऊल शेती आणि शेतकऱ्यांच्या विकासाच्या दृष्टीने असते, असं मोदी म्हणाले होते.
हेही वाचा >> “पंतप्रधानांनी दोन वर्षांपूर्वी बारामतीत येऊन…”, शरद पवारांवरील टीकेनंतर संजय राऊतांचा टोला
“एकाच व्यासपीठावर अजितदादा असताना त्यांच्यासमोर नरेंद्र मोदींनी शरद पवारांबाबत वक्तव्य केलं, हे ऐकल्यानंतर एकतर अजित पवारांनी व्यासपीठ सोडून जायला हवं होतं किंवा दोन मिनिटं नरेंद्र मोदींना थांबवून अधिकची माहिती द्यायला हवी होती. ही माहिती ऐकून नरेंद्र मोदींनी दुरुस्ती केली असती असं मला वाटतं”, असं अनिल देशमुख म्हणाले. शरद पवारांवर केलेल्या टीकेवर प्रत्युत्तर देण्याकरता त्यांनी आज पत्रकार परिषद आयोजित केली होती.
काय म्हणाले होते नरेंद्र मोदी?
“महाराष्ट्रातील एक वरिष्ठ नेते (शरद पवार) केंद्र सरकारमध्ये अनेक वर्षे कृषीमंत्री होते. व्यक्तिगत पातळीवर मी त्यांचा सन्मान करतो. पण त्यांनी शेतकऱ्यांसाठी काय केलं? त्यांनी आपल्या सात वर्षांच्या कार्यकाळात देशातील शेतकऱ्यांकडून केवळ साडेतीन लाख कोटींचा शेतीमाल एमएसपीवर खरेदी केला. पण आमच्या सरकारने सात वर्षांत साडे तेरा लाख कोटी रुपये शेतकऱ्यांना दिले”, अशी टीका मोदींनी गुरुवारी आपल्या भाषणातून केली.