जळगाव : ‘विधानसभा निवडणुकीत उमेदवारी देणार नाही, असे पक्षाने मला कळवले आहे. पक्षाचा हा निर्णय मला मान्य असून, मी पक्षाशी एकनिष्ठ राहणार आहे’, अशी नरमाईची भूमिका भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी गुरुवारी घेतली. भाजपच्या तिसऱ्या यादीतही खडसे यांना स्थान मिळालेले नाही. उमेदवारी न मिळाल्याने खडसे समर्थकांनी गुरुवारी त्यांच्या निवासस्थानी गर्दी केली होती. त्यावेळी अपक्ष म्हणून लढा, असा आग्रह कार्यकर्त्यांनी केला. मात्र, खडसे यांनी नरमाईची भूमिका घेतली. ‘मंत्रिपदी असताना राजीनामा देण्याचा निरोप पक्षनेत्यांनी दिला तेव्हा एका मिनिटात राजीनामा दिला होता. आता पक्षाने उमेदवारी नाकारली. शेवटी निर्णय पक्षाचा असतो. तो आपल्याला मान्य आहे’, असे स्पष्ट करत खडसे यांनी बंडाचा पवित्रा न घेण्याचे संकेत दिले. मात्र, खडसे यांनी आधीच उमेदवारी अर्ज दाखल केला असून, त्याबाबत त्यांनी कोणतीही भूमिका जाहीर केलेली नाही.
भाजपचे नाराज नेते संपर्कात : पवार
भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे, विनोद तावडे आणि चंद्रशेखर बावनकुळे यांना पक्षाच्या उमेदवारी याद्यांत स्थान मिळालेले नसतानाच भाजपचे नाराज नेते तीन-चार महिन्यांपासून संपर्कात आहेत, असा गौप्यस्फोट राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी गुरुवारी केला. कळवा-मुंब्रा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार जितेंद्र आव्हाड यांचा उमेदवारी अर्ज भरताना शरद पवार उपस्थित होते. त्या वेळी पवार यांनी भाजपमधील नाराजांबद्दल भाष्य करतानाच सरकारवर टीका केली. या वेळी जेएनयूचा माजी विद्यार्थी नेता कन्हैया कुमारही उपस्थित होता.