कल्याण – राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांनी भाजपात असताना त्यांना खूप छळल्याचा आरोप केला. तसेच सध्याचं राजकारण खूप खालच्या स्तरावर सुरू असल्याबद्दल दुःख व्यक्त केलं. यावेळी एकनाथ खडसे यांनी माझ्या हातात इतकी शक्ती आहे की अनेकांना देशोधडीला लावू शकतो, असंही वक्तव्य केलं. कल्याण डोंबिवली जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस व खानदेश संघटनांतर्फे आमदार एकनाथ खडसे यांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता. या सत्कार कार्यक्रमात एकनाथ खडसे बोलत होते.
एकनाथ खडसे म्हणाले, “मागच्या आठवड्यात माझ्या खात्यातले पैसे काढून टाकले, एक रुपया ठेवला नाही. पहिलं खातं गोठवलं, आता पैसे काढून टाकले. त्यानंतर राहते घरं १० दिवसात खाली करण्याची नोटीस आली. नाथा भाऊने असा काय गुन्हा केला. न्यायालयात जाऊन स्टे आणला म्हणून त्या घरात राहतोय. असं खालच्या स्तराचं राजकारण अनुभवलं नव्हतं.”
“माझ्या हातात इतकी शक्ती आहे की अनेकांना देशोधडीला लावू शकतो”
“असं करायचं असतं, तर मला अनेकांना छळता आलं असतं. माझ्या हातात इतकी ताकद आणि शक्ती आहे की अनेकांना देशोधडीला लावू शकतो. दुर्दैवाने असा विचार मी करत नाही. दुसऱ्यांना सहकार्याची भूमिका असते. न्यायालयाने संरक्षण दिलं म्हणून आम्ही संपूर्ण कुटुंब जामिनावर बाहेर आहोत. नाही तर संपूर्ण कुटुंब तुरुंगात असतं. या सगळ्या अडचणीत शरद पवार यांनी साथ दिली, मदत केली, नाही तर नाथाभाऊ होत्याच नव्हता झाला असता,” असं एकनाथ खडसे यांनी सांगितलं.
“…त्याशिवाय एकनाथ शिंदे इतकं धाडस करणार नाही”
एकनाथ खडसे पुढे म्हणाले, “सध्या राज्यात जे राजकारण चाललं आहे तो शिवसेनेचा अंतर्गत प्रश्न असल्याचं दिसत असले. असं असलं तरी यामागे कोणती तरी मोठी शक्ती आहे. त्यामुळे हे सगळं घडतंय, असं म्हणायला वाव आहे. कुणी तरी ताकद देत असल्याशिवाय एकनाथ शिंदे इतकं धाडस करणार नाही. भविष्यात कोण त्यांच्या पाठीमागे आहे हे समोर येईलच.”
पाहा व्हिडीओ –
“मला कधीही बोलवा, मी येईन”; खडसेंचं कल्याणकरांना आश्वासन
“माझ्यामागे जी शक्ती आहे, जी ताकद आहे ती तुमची आहे. मला सर्वोच्च स्थानापर्यंत पोचविण्याचं काम तुम्ही केलंय. मी राज्याचा आमदार आहे. कधीही मला बोलवा, मी येईन. येत्या काही महिन्यात महिन्यातून एकदा एक दिवस कल्याणमध्ये तुमच्या समस्या जाणून घेण्यासाठी असेन,” असंही एकनाथ खडसे यांनी नमूद केलं.